मेलोनींच्या पोस्टने पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा!

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
रोम,
Meloni's post on Pakistan's role अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या शांतता करारानंतर पाकिस्तानची भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे. या कराराच्या प्रक्रियेत मध्यस्थीची भूमिका बजावल्याबद्दल अनेक युरोपीय देशांच्या नेत्यांनी पाकिस्तान आणि कतारचे कौतुक केले असून, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या वक्तव्याची विशेष चर्चा रंगली आहे. शांतता करारानंतर सोशल मीडियावर केलेल्या एका संदेशात मेलोनी यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील सामंजस्याचे स्वागत करत या प्रक्रियेत योगदान देणाऱ्या सर्व देशांचे आभार मानले. विशेषतः पाकिस्तान आणि कतार यांनी संवादाचा मार्ग खुला ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर आंतरराष्ट्रीय राजनैतिक वर्तुळात पाकिस्तानच्या सहभागाबाबत चर्चा सुरू झाली आहे.
 
 
Meloni
 
मेलोनी यांनी या कराराला मध्यपूर्वेत स्थैर्य निर्माण करण्यासाठी महत्त्वाची संधी असल्याचे म्हटले. त्यांनी पुढे सांगितले की, व्यापक आणि दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू राहणे आवश्यक आहे. इटली या प्रक्रियेला पूर्ण पाठिंबा देण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.युरोपातील इतर प्रमुख देशांनीही या कराराचे स्वागत केले आहे. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनच्या नेतृत्वाने संयुक्त निवेदनाद्वारे अमेरिका-इराण संवाद यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच या प्रक्रियेत मध्यस्थी करणाऱ्या देशांच्या प्रयत्नांची दखल घेत कराराची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
 
 
दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि प्रदेशातील तणाव कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याची गरज असल्याचेही युरोपीय नेत्यांनी अधोरेखित केले. मध्यपूर्वेतील शांतता, सुरक्षित सागरी मार्ग आणि प्रादेशिक स्थैर्य यासाठी आगामी काळात अधिक राजनैतिक संवाद आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे पाकिस्तानची मध्यस्थ म्हणून झालेली भूमिका पुन्हा एकदा जागतिक पटलावर चर्चेत आली असून, मेलोनी यांच्या वक्तव्याने या चर्चेला अधिकच बळ मिळाले आहे.