- कारागृह प्रशासनाचा संयुक्त उपक्रम
नागपूर,
Nagpur Central Jail आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर मध्यवर्ती कारागृह आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षाबंद्यांसाठी विशेष योगशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २१ जूनपर्यंत दररोज सकाळी ८ ते ९.३० वाजेदरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. कारागृह अधीक्षक तथा कारागृह उपमहानिरीक्षक (पूर्व विभाग) वैभव आगे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. योग, प्राणायाम आणि मानसिक स्वास्थ्य याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे शिबिर राबविण्यात येत आहे.
शिबिराच्या पहिल्या दिवशी आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग प्रशिक्षक श्री सुनील आमटे आणि श्री नवीन खानोलकर यांनी उपस्थित राहून शिक्षाबंद्यांना योगाचे महत्त्व, विविध योगासने तसेच प्राणायामाचे मार्गदर्शन केले. या योगशिबिराच्या उद्घाटन सत्रात १०५ पुरुष शिक्षाबंद्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक शांतता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचा लाभ होत असल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले. संपूर्ण आठवडाभर चालणाऱ्या या शिबिरामध्ये विविध योगक्रिया, ध्यानधारणा आणि व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित मार्गदर्शन करण्यात येणार आहे.