नागपूर,
nagpur news अधिकमासानिमित्त नागपूर शहरात विविध ठिकाणी श्रीमद्भागवत प्रवचनांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र शहरापासून दूर असलेल्या शिव एलिट टाऊनशिपमधील रहिवाशांना दररोज नागपूरमध्ये जाऊन प्रवचन ऐकणे शक्य होत नव्हते. अशावेळी वर्षा व्ही. देशपांडे यांनी एक अभिनव उपक्रम राबवत श्रीमद्भागवत वाचनाचा संकल्प पूर्ण केला. वर्षा देशपांडे यांना श्रीमद्भागवत ऐकण्याची तीव्र इच्छा होती. त्यावेळी त्यांना पद्मगंधा प्रतिष्ठानच्या ग्रुपवर त्यांच्या विदुषी मैत्रीण सुषमा गलगलीकर यांनी श्रीमद्भागवताचा सखोल अभ्यास करून लिहिलेल्या २०५ भागांची आठवण झाली. त्यातूनच "हेच वाचून श्रीमद्भागवताचा लाभ का घेऊ नये?" ही कल्पना सुचली.

यानंतर मधुरा आचार्य, सीमा वैद्य, विशाखा खनगन आणि अंजू ताम्हणे या भागवत वाचनाची आवड असलेल्या मैत्रिणींना सोबत घेऊन "श्रीमद्भागवत कथा" हा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला. या ग्रुपवर सुषमा गलगलीकर यांनी लिहिलेले श्रीमद्भागवताचे २०५ भाग पोस्ट करण्यात आले. सलग १६ दिवसांचा श्रीमद्भागवत वाचन उपक्रम सुरू झाला. दररोज सकाळी साडेआठ ते दहा या वेळेत अत्यंत भक्तिभावाने वाचन केले जात होते. कार्यक्रमाची सुरुवात पंचोपचार पूजनाने होत असे. त्यानंतर श्रीमद्भागवताचे वाचन आणि वाचनानंतर श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण केले जात असे. प्रसाद ग्रहण करून दिवसाचा कार्यक्रम संपन्न होत असे. विशेष म्हणजे, या संपूर्ण उपक्रमात एकदाही खंड पडला नाही.
१० जून रोजी पारणे करून हा संकल्प पूर्ण करण्यात आला. उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याबद्दल सर्व सहभागी महिलांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले. वर्षा देशपांडे यांनी सांगितले की, मोबाईलच्या माध्यमातूनही श्रीमद्भागवताचे नियमित वाचन आणि अभ्यास करता येतो. या उपक्रमातून सर्वांना आध्यात्मिक अनुभूती मिळाली तसेच जीवनमूल्यांचे मार्गदर्शनही लाभले. या उपक्रमामुळे श्रीमद्भागवताचे महत्त्व अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होत असून धर्मग्रंथांचा प्रसार होण्यासही हातभार लागत असल्याचे सहभागींचे मत आहे. प्रवचनस्थळी जाऊन भागवत ऐकणे लाभदायक असतेच; मात्र ते शक्य नसल्यास अशा प्रकारचे वाचन उपक्रमही तितकेच उपयुक्त ठरू शकतात. लेखिका सुषमा गलगलीकर यांनी सांगितले की, त्यांच्या श्रीमद्भागवत लेखनाचा उद्देश जास्तीत जास्त लोकांपर्यंत या ग्रंथातील विचार पोहोचवणे आणि त्याचा प्रचार-प्रसार करणे हा आहे. या उपक्रमामुळे त्यांच्या लेखनाचा समाजाला लाभ होत असल्याचे पाहून त्यांनाही विशेष आनंद झाला.
सौजन्य: वर्षा देशपांडे, संपर्क मित्र