आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते सत्कार
बुलढाणा,
National Karate Championship वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील शोतोकान कराटे स्पर्धेत धर्मवीर मार्शल आर्ट स्पोर्ट कराटे असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत बुलढाणा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि नऊ कांस्यपदके पटकावत उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच संघाच्या सर्वांगीण उत्कृष्ट प्रदर्शनाची दखल घेत त्यांना बेस्ट टीम ट्रॉफी प्रदान करण्यात आली. या नेत्रदीपक यशाबद्दल आ. संजय गायकवाड यांनी प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला.
दि. १३ व १४ जून रोजी वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील माजी खासदार रामदास तडस क्रीडा संकुलात स्पोर्ट शोतोकान कराटे असोसिएशनच्या विद्यमाने राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील विविध राज्यांतील कराटेपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या आणि उच्च दर्जाच्या या स्पर्धेत धर्मवीर मार्शल आर्ट स्पोर्ट कराटे असोसिएशनच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्य, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर पदकांची लयलूट केली. या स्पर्धेत कुमारी रेवा वसे आणि रुद्रांश अवसरमोल यांनी सुवर्णपदके पटकावत संघाला अभिमानास्पद यश मिळवून दिले. विश्वदीप बाभुळकर याने रौप्यपदक प्राप्त केले. तर कुमारी ऋतुजा टेकाळे, कुमारी कार्तिकी डांगे, कुमारी प्राप्ती बाभुळकर, कुमारी जागृती बाभुळकर, कुमारी रसिका पाटील, कुमारी परी वसे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी कांस्यपदके मिळवून संघाच्या यशात मोलाची भर घातली. या यशामागे प्रशिक्षक श्री अरविंद अंबुसकर यांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची कठोर मेहनत महत्त्वाची ठरल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. सत्कार सोहळ्याला पालकवर्ग, क्रीडाप्रेमी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.