नवी दिल्ली,
Nature will display its fierce form next year जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांदरम्यान जगाला आणखी एका मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा आंतरराष्ट्रीय हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. प्रशांत महासागरात एल-निनोची प्रक्रिया सुरू झाल्याची पुष्टी विविध हवामान संस्थांच्या प्राथमिक विश्लेषणातून होत असून, २०२६-२७ मध्ये हा एल-निनो अत्यंत तीव्र म्हणजेच ‘सुपर एल-निनो’च्या स्वरूपात विकसित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जर असे झाले तर जगभरातील हवामान चक्रांमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते.
उष्णतेच्या लाट, दीर्घकालीन दुष्काळ, अतिवृष्टी, पूर
हवामानशास्त्रानुसार, प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान असामान्यरीत्या वाढल्यास एल-निनोची स्थिती निर्माण होते. या प्रक्रियेचा परिणाम केवळ समुद्रापुरता मर्यादित राहत नाही, तर जगभरातील पाऊस, तापमान, वादळे आणि हवामानाच्या इतर नमुन्यांवरही त्याचा थेट परिणाम होतो. याउलट समुद्राचे तापमान कमी झाल्यास ला-नीना स्थिती तयार होते. या दोन्ही घटना जागतिक हवामान व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक मानल्या जातात. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सप्टेंबर २०२६ पासून एल-निनोचा प्रभाव अधिक स्पष्टपणे दिसू लागेल. डिसेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ हा त्याचा सर्वाधिक प्रभावाचा कालावधी असू शकतो. या काळात अनेक देशांमध्ये विक्रमी उष्णतेच्या लाटा, दीर्घकालीन दुष्काळ, अतिवृष्टी, पूर आणि तीव्र वादळांचा धोका वाढू शकतो.
भारतासाठी ही परिस्थिती विशेषतः चिंताजनक मानली जात आहे. भारतीय शेती आणि अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर मान्सूनवर अवलंबून असल्यामुळे एल-निनोचा परिणाम थेट कृषी क्षेत्रावर होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, एल-निनो सक्रिय झाल्यास देशातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण घटू शकते. परिणामी धरणांतील पाणीसाठा कमी होणे, पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि अन्नधान्य उत्पादनात घट अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.ऑस्ट्रेलिया, दक्षिण-पूर्व आशिया आणि आफ्रिकेतील काही भागांनाही दुष्काळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जंगलातील आगी, पाण्याचे संकट आणि शेतीचे नुकसान या प्रदेशांमध्ये गंभीर समस्या बनू शकतात. दुसरीकडे, पूर्व आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकेतील काही भागांमध्ये अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत शेतीचे नुकसान, भूस्खलन आणि मोठ्या प्रमाणावर विस्थापन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जगभरातील सरकार सतर्क
युरोपमध्येही हवामानाच्या पारंपरिक पद्धती बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही भागांमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक उष्ण वातावरण राहू शकते. हवामानातील या बदलांचा ऊर्जा वापर, अन्न उत्पादन आणि आर्थिक घडामोडींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.तज्ज्ञांच्या अहवालानुसार, एल-निनोचा सर्वात मोठा फटका आधीच संकटात असलेल्या गरीब आणि विकसनशील देशांना बसू शकतो. आफ्रिकेतील अनेक देश, जिथे अन्नटंचाई, संघर्ष आणि आर्थिक अडचणी आधीच आहेत, तेथे दुष्काळ आणि पुरांमुळे मानवी संकट अधिक गडद होऊ शकते. लाखो लोकांना स्थलांतर करावे लागू शकते, तर काही भागांमध्ये अन्न व पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे जगभरातील सरकारे सतर्क झाली असून आगामी काही महिने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. २०२६-२७ मधील एल-निनो किती प्रभावी ठरतो, यावर जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था, शेती आणि जनजीवनाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.