नागपूर,
neet-re-examination : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) प्रक्रियेची विश्वासार्हता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी यंदा अभूतपूर्व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अलीकडील प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाच्या देखरेखीखालील विशेष मालवाहू विमानांद्वारे गोपनीय प्रश्नपत्रिकांचे साठे नागपुरात आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेशी संबंधित संवेदनशील साहित्य घेऊन आलेले पहिले मालवाहू विमान रविवारी रात्री सुमारे १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. सुमारे ४५ मिनिटांच्या थांब्यानंतर हे विमान पुढील प्रवासासाठी पुण्याकडे रवाना झाले. त्यानंतर सोमवारी सकाळी आणखी दोन हवाई दलाची विमाने नागपुरात दाखल झाली.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. नियुक्त अधिकारी, सुरक्षा यंत्रणा आणि संबंधित कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता. प्रश्नपत्रिकांची वाहतूक, साठवणूक आणि हस्तांतरण प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आली असून, अनधिकृत हस्तक्षेप किंवा छेडछाड टाळण्यासाठी विशेष कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला.
सूत्रांच्या माहितीनुसार, हवाई दलावर देशभरातील विविध परीक्षा केंद्रांपर्यंत प्रश्नपत्रिकांचे सुरक्षित वितरण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. देशाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नागपूरच्या भौगोलिक स्थानामुळे आणि विकसित लॉजिस्टिक्स यंत्रणेमुळे संवेदनशील परीक्षा साहित्याच्या वाहतुकीसाठी शहर महत्त्वाचे केंद्र ठरले आहे.