मुंढे पॅटर्नचा धसका
अमरावती/तिवसा,
Pan stall closed कडक शिस्त, धाडसी निर्णयक्षमता आणि भ्रष्टाचाराविरोधातील आक्रमक भूमिकेमुळे ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच राज्यभर धडक कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या तपासणी मोहिमेमुळे अनेक व्यापारी, खाद्य व्यवसायिक आणि भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईची दहशत एवढी वाढली आहे की, गुटखा, पानमसाल्यांची सर्रास विक्री करणार्या बहुतांश पानटपर्या बंद आहेत आणि ज्या उघड्या आहेत त्यांनी विकणे बंद केले आहे.
अमरावती जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात व गावात गुटखा, पानमसाला, संगुधी तंबाखू या सारखे प्रतिबंधित साहित्य मोठ्या प्रमाणात विकले जाते. जिल्ह्यातल्या पानटपरी चालकांचा एक प्रकारे हाच मुख्य व्यवसाय आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात एफडीएचे अधिकारी सर्वत्र तपासणी करीत आहे. आपल्याही पानठेल्याची चौकशी होईल धास्तीने सर्वच घाबरले आहे. तिवसा शहरातील आठवडी बाजार परिसर, पेट्रोल पंप चौक, बसस्थानक चौक तसेच सॉफ्ट कॉर्नर चौक परिसरातील बहुतांश पानटपर्या आणि काही भागातील लहान व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील अनेक गावांमधील पानटपरी चालकांनीही संभाव्य कारवाईच्या भीतीने आपले व्यवसाय तात्पुरते बंद ठेवणे पसंत केले आहे. हीच स्थिती अन्य तालुक्यांमध्ये व अमरावती शहरात आहे. एफडीएच्या वाढत्या हालचालींमुळे अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, परवानग्या आणि नियमांचे पालन याकडे प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणारे व्यावसायिक सध्या सावध भूमिका घेताना दिसत आहेत.
अनेकांना कारवाईची धास्ती
अनेक ठिकाणी स्वच्छता, परवाने आणि अन्नसुरक्षा नियमांची पडताळणी सुरू आहे. केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार होणार्या धडक कारवाईचा धसका घेत अनेक छोटे-मोठे व्यवसायिक, पानटपर्या चालकांनी आपली दुकाने बंद ठेवण्यातच धन्यता मानल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः भेसळयुक्त पदार्थ विक्री करणारे तसेच नियमांचे पालन न करता व्यवसाय करणारे व्यापारी अधिकच धास्तावले असून संभाव्य कारवाई टाळण्यासाठी त्यांनी तात्पुरता व्यवसाय बंद ठेवण्याचा मार्ग स्वीकारल्याची चर्चा बाजारपेठेत रंगत आहे.