इस्लामाबाद,
PCB's new move पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे प्रशासकीय बदल घडवून आणत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केंद्रीय करार व्यवस्थेची संपूर्ण रचना बदलण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ श्रेणीतील करार पद्धत आता इतिहासजमा होणार असून तिच्या जागी खेळाडूंच्या कौशल्य आणि फॉरमॅटनुसार नवीन प्रणाली लागू केली जाणार आहे. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी लाहोरमध्ये या नव्या धोरणाची घोषणा केली. त्यांच्या मते, जुन्या प्रणालीमध्ये खेळाडूंच्या श्रेणीकरणावरून अनेकदा वाद निर्माण होत होते. कोणाला कोणत्या गटात स्थान मिळाले आणि का मिळाले नाही, यावरून असंतोष निर्माण होत असल्याने अधिक पारदर्शक आणि डेटा-आधारित मॉडेल विकसित करण्यात आले आहे.

नवीन व्यवस्थेनुसार खेळाडूंना वेगवेगळ्या क्रिकेट प्रकारांमधील सहभागानुसार स्वतंत्र ट्रॅकमध्ये विभागले जाईल. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना विशेष प्रोत्साहन दिले जाणार असून त्यांना अधिक आर्थिक लाभ मिळतील. त्याचबरोबर एकदिवसीय आणि टी-२० प्रकारातील खेळाडूंनाही त्यांच्या भूमिकेनुसार वेगवेगळ्या करारांमध्ये समाविष्ट केले जाईल. टी-२० विशेषज्ञांना जगभरातील फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्यासाठी अधिक स्वातंत्र्य देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.या नव्या प्रणालीत खेळाडूंच्या मूल्यमापनाची पद्धतही बदलणार आहे. केवळ धावा किंवा विकेट्स यांवर लक्ष केंद्रित न करता, सामन्याच्या निकालावर खेळाडूच्या योगदानाचा किती प्रभाव पडला यालाही महत्त्व दिले जाणार आहे. त्यामुळे आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष सामन्यातील प्रभावी कामगिरीला अधिक मूल्य मिळेल.
पाकिस्तानचे व्हाईट-बॉल प्रशिक्षक माईक हेसन यांनी या निर्णयाचे स्वागत करत, यामुळे कसोटी क्रिकेटला चालना मिळेल आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील खेळाडूंनाही अधिक संधी उपलब्ध होतील, असे सांगितले. तर प्रशिक्षक Aaqib Javed यांनी आधुनिक क्रिकेटमध्ये प्रभावी योगदानाचे मूल्यमापन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. पीसीबीच्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवे युग सुरू होण्याची चिन्हे दिसत असून, खेळाडूंच्या करार, मानधन आणि निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.