आधी आईवर तलवारीने वार; नंतर मुलाची निर्घृण हत्या

आठ जणांवर गुन्हा दाखल तर तिघे पोलिसांच्या ताब्यात

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
रिसोड,
Risod News शहरातील हिंगोली मार्गावरील माणुसकी नगर भागात १५ जून रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास एक रक्ताळलेला थरार घडला. जुन्या वादाचा राग मनात धरून, रस्त्यावरील नालीच्या ढाप्यावर गाढ झोपेत असलेल्या ३८ वर्षीय युवकाचा डोयावर दगड आणि लोखंडी रॉडने जबर वार करून निर्घृण खून करण्यात आला. भगवान सुभाष गायकवाड असे मृतकाचे नाव आहे. या घटनेच्या काही तास आधीच आरोपींनी मृतकाच्या आईवर तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. एकाच रात्री घडलेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे आणि हत्येमुळे संपूर्ण रिसोड शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रिसोड पोलिसांनी आठ जणांविरोधात हत्येसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे.
 
 
Risod News
 
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माणुसकी नगर येथील रहिवासी बाली बळीराम गायकवाड यांनी रिसोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या शेजारी राहणारा प्रमोद संजय अंभोरे आणि त्याचे इतर सात साथीदार नेहमीच गायकवाड कुटुंबाशी किरकोळ कारणावरून वाद घालत असत.१५ जून रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास, बाली गायकवाड यांचे दीर अनिल गायकवाड हे फोनवर जोरजोरात बोलत होते. याच कारणाचा राग धरून प्रमोद अंभोरे, दीपक अंभोरे, गजानन बाजड, मनीषा अंभोरे, सीता अंभोरे, शितल मानवतकर, आदित्य मानवतकर आणि संजय अंभोरे यांनी अनिल यांना लाथाबुयायांनी व लाठीकाठीने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
 
 
हा वाद सोडवण्यासाठी अनिल यांची आई विमल सुभाष गायकवाड तिथे गेल्या. दरम्यान, आरोपींनी थेट विमल यांच्या पायावर तलवारीने जोरदार वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तलवारीच्या वारामुळे विमल गायकवाड या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्यांना तातडीने रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी वाशिम आणि त्यानंतर अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले. कुटुंबातील मुख्य सदस्य जखमी विमल यांच्यासोबत दवाखान्यात गेल्यामुळे संध्याकाळी पोलिसात तक्रार देता आली नाही. इतर सदस्य रात्री जेवण करून घरी झोपले.मृतक भगवान गायकवाड हे रात्रीच्या वेळी घरासमोरील रस्त्यावर असलेल्या नालीच्या सिमेंटच्या ढाप्यावर अंथरूण टाकून झोपले होते. आईवर झालेल्या हल्ल्याच्या धयातून कुटुंब सावरत असतानाच, मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शेजार्‍याने धावत येऊन कुटुंबाला उठवले. भगवान यांच्यावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंबाने बाहेर येऊन पाहिले असता भगवान हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठीच प्रमोद अंभोरे व त्याच्या इतर सात साथीदारांनी भगवान यांच्या डोयावर दगड किंवा लोखंडी रॉड मारून त्यांचा खून केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
 
 
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपविभागीय अधिकारी नवदीप अग्रवाल आणि रिसोड पोलिस ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी फॉरेन्सिक लॅब (न्यायवैद्यक शाखा) आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.रिसोड पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ११८, ११५(२) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष आघाव, पोलीस उपनिरीक्षक वसंत तहकीक आणि त्यांचे पथक करत आहे.