आनंदवार्ता...होर्मुझमधून ३४ जहाजे भारताच्या दिशेने मार्गस्थ

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
तेहरान,
ships heading towards India from Hormuz पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक घडामोड समोर आली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून अनेक व्यापारी जहाजांनी सुरक्षित मार्गक्रमण सुरू केले असून ऊर्जा आणि खतांचा महत्त्वपूर्ण साठा घेऊन येणारी ३४ जहाजे लवकरच भारतीय बंदरांवर पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे ऊर्जा आणि कृषी क्षेत्रातील पुरवठा साखळीला मोठा आधार मिळणार आहे. नौवहन क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रवीकृत नैसर्गिक वायू (LNG) वाहून नेणाऱ्या एका मोठ्या जहाजाने होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करत भारताच्या दिशेने प्रवास पूर्ण केला आहे. या यशस्वी प्रवासामुळे इतर जहाजांच्याही सुरक्षित आगमनाबाबत आशावाद निर्माण झाला आहे.
 
 
 India from Hormuz
 
भारताकडे येणाऱ्या जहाजांमध्ये कच्चे तेल, एलएनजी, एलपीजी तसेच खतांसाठी आवश्यक असलेला कच्चा माल मोठ्या प्रमाणात आहे. युरिया, डीएपी, सल्फर आणि अमोनिया यांसारख्या कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या वस्तूंचा पुरवठा या जहाजांमुळे सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी हंगामाच्या दृष्टीने हा पुरवठा महत्त्वाचा मानला जात आहे.भारताच्या ऊर्जा गरजांपैकी मोठा हिस्सा पश्चिम आशियातून पूर्ण केला जातो. विशेषतः कच्चे तेल, स्वयंपाकाचा गॅस आणि नैसर्गिक वायू यांची आयात मोठ्या प्रमाणातहोर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत राहणे भारतासाठी अत्यंत आवश्यक मानले जाते.
 
तथापि, पश्चिम आशियातील काही ऊर्जा प्रकल्प आणि प्रक्रिया केंद्रांना झालेल्या नुकसानीमुळे ऊर्जा पुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी काही काळ लागू शकतो. काही महत्त्वाच्या गॅस आणि ऊर्जा सुविधांचे कामकाज अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नसल्याने जागतिक ऊर्जा बाजारपेठेवर त्याचा परिणाम कायम आहे. त्यामुळे परिस्थिती सुधारत असली तरी प्रशासन आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ सावध भूमिका घेत आहेत. दरम्यान, जहाजांच्या सुरक्षित आगमनामुळे भारतातील ऊर्जा आणि खत पुरवठ्याबाबत निर्माण झालेली चिंता काही प्रमाणात कमी झाली असून उद्योग, शेती आणि ग्राहकांना याचा सकारात्मक फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.