यंदा भक्तांकडून साईचरणी 'सबुरी’चे दान

शिर्डी संस्थानच्या उत्पन्नात घट

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
अहिल्यानगर,
Shirdi Sansthan's income drops अहिल्यानगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिर्डी येथील साईबाबा संस्थान ट्रस्टच्या 2025-26 आर्थिक वर्षातील वार्षिक आर्थिक अहवालातून मिश्र चित्र समोर आले आहे. भाविकांकडून दान मोठ्या प्रमाणावर सुरू असले तरी एकूण आर्थिक उत्पन्नात मागील वर्षाच्या तुलनेत घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.2024-25 या आर्थिक वर्षात संस्थानचे एकूण उत्पन्न 648 कोटी रुपये होते, तर 2025-26 मध्ये ते 638 कोटी रुपयांवर आले आहे. म्हणजेच सुमारे 10 कोटी रुपयांची घट नोंदवली गेली आहे. मात्र, संस्थानकडून मिळालेल्या माहितीनुसार याच काळात 15 कोटी रुपयांचे वस्तुरूप दानही प्राप्त झाले असून त्याचा हिशेब वेगळ्या स्वरूपात नोंदवला जातो.
 

Shirdi 
सोने-चांदीच्या दानात मात्र लक्षणीय वाढ
दुसरीकडे, भाविकांनी साईचरणी अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या दानात मात्र लक्षणीय वाढ झाली आहे. 2024-25 मध्ये हे दान सुमारे 13 कोटी 95 लाख रुपये होते, तर 2025-26 मध्ये ते वाढून 19 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. या कालावधीत अंदाजे 16 किलो सोने आणि 197 किलो चांदी संस्थानला अर्पण करण्यात आली आहे.संस्थानच्या आकडेवारीनुसार सध्या एकूण ठेवी 3,603 कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. तसेच संस्थानकडे एकूण 550 किलो सोने आणि तब्बल 7030 किलो चांदीचा साठा उपलब्ध आहे. या आर्थिक अहवालातून एकीकडे एकूण उत्पन्नात घट दिसत असली तरी भाविकांच्या श्रद्धेत आणि मौल्यवान धातूंच्या दानात वाढ झाल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे.