शेतकर्‍यांचा लोकसहभागातून रस्ता तयार करण्याचा निर्धार

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
सिंदीरेल्वे,
sindi railway सेलू पळसगाव (बाई) ते तुळजापूर (भोसा) दरम्यानच्या शेतपांदन रस्त्याची शासकीय मोजणी पडली. शासनाच्या महत्त्वाकांक्षी बळीराजा पांदण रस्ता योजनेअंतर्गत ही मोजणी करण्यात आली. शेतकर्‍यांनी आता लोकसहभागातून हा रस्ता तयार करण्याचा निश्चय केला आहे. तहसिलदार सेलू आणि उप-अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पळसगाव (बाई) ते भोसा रस्ता दरम्यानच्या शेतपांदन रस्त्याची मोजणी करण्यात आली.
 
 
sindi railway
 
या वेळी भूमी अभिलेख विभागाचे मोजणीदार स्वप्नील चौधरी, सुधीर कावरे (भु.प्र.अ.), महसूल विभागाचे धम्मदीप थुल यांच्यासह स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोजणी दरम्यान रस्ता मार्गावर काही ठिकाणी अनधिकृत अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले आहे. मोजणी प्रक्रियेनंतर पळसगाव (बाई) येथील शेतकरी प्रवीण तळवेकर आणि शेतकर्‍यांनी तहसिलदारांना निवेदन दिले. शेतपांदन रस्त्याचा फायदा परिसरातील ३० ते ३५ शेतकर्‍यांना होणार आहे. रस्ता अडथळ्यामुक्त झाल्यामुळे शेतीमालाची ने-आण करणे आता सोपे होणार आहे. शेतकर्‍यांनी हा रस्ता लोकसहभागातून तयार करण्याचा संकल्प केला असून रस्ता कामासाठी आवश्यक असलेला मुरूम प्रशासनाने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.