पंतप्रधान मोदींना स्लोव्हाकियाचा सर्वोच्च सन्मान

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
ब्रातिस्लावा,
Slovakia's highest honor to PM Modi युरोप दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्लोव्हाकिया दौरा ऐतिहासिक ठरला. या भेटीदरम्यान स्लोव्हाकियाने पंतप्रधान मोदींना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करून गौरविले. भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. स्लोव्हाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा सन्मान पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आला. परदेशी नेत्यांना दिला जाणारा हा देशातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. यामुळे जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या प्रभावाची आणि पंतप्रधान मोदींच्या आंतरराष्ट्रीय नेतृत्वाची पुन्हा एकदा नोंद झाली आहे.
 

modi 
 
या दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यात सविस्तर चर्चा झाली. दोन्ही देशांनी संरक्षण, व्यापार, डिजिटल तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि स्थलांतर यांसह अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला. या चर्चेनंतर परस्पर सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील संबंधांना अधिक व्यापक स्वरूप देण्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले. वाढता व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षण क्षेत्रातील भागीदारी यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
 
 
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकियाच्या नेतृत्वाला भारत भेटीचे निमंत्रणही दिले. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणातील सक्रिय भूमिकेची ही आणखी एक महत्त्वाची नोंद मानली जात आहे. गेल्या काही वर्षांत विविध देशांकडून त्यांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय सन्मानांच्या यादीत आता आणखी एका प्रतिष्ठित पुरस्काराची भर पडली आहे. भारताची जागतिक पातळीवरील वाढती भूमिका आणि विविध देशांशी दृढ होत असलेले संबंध याचे हे प्रतीक मानले जात आहे.