विक्रमाच्या दारात स्मृती मंधाना

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
smriti mandhana भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना ही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा ऐतिहासिक टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. पुरुष आणि महिला खेळाडूंच्या एकत्रित टी-२० आंतरराष्ट्रीय धावांच्या विक्रम यादीत ती पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज बाबर आझम याला मागे टाकण्याच्या स्थितीत आहे.

smriti mandhana
 
सध्याच्या आकडेवारीनुसार, न्यूझीलंडची अनुभवी फलंदाज सुझी बेट्स ही ४७२० धावांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर बाबर आझमने ४५९६ धावा केल्या असून तो दुसऱ्या स्थानावर आहे. स्मृती मंधानाच्या नावावर सध्या ४४०१ धावा आहेत आणि ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्मृती आणि बाबर यांच्यातील अंतर केवळ १९५ धावांचे आहे. आगामी सामन्यांमध्ये ही भरपाई केल्यास स्मृती मंधाना या एकत्रित यादीत बाबर आझमला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर झेप घेऊ शकते. तिची सध्याची फॉर्म पाहता ही कामगिरी लवकरच शक्य होईल, असे क्रिकेट वर्तुळात मानले जात आहे.
 
 
अलीकडेच झालेल्या सामन्यात स्मृतीने पाकिस्तानविरुद्ध ४४ चेंडूंमध्ये ६८ धावांची खेळी करत आपला फॉर्म परत मिळवला आहे. त्यामुळे तिच्याकडून आगामी स्पर्धांमध्ये मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. जर स्मृतीने बाबर आझमला मागे टाकले, तरी तिच्यासमोर पुढील मोठे आव्हान म्हणजे सुझी बेट्सचा विक्रम असेल. त्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिला आणखी काही उत्कृष्ट खेळ्या कराव्या लागतील. सध्या मात्र सर्वांचे लक्ष याकडे आहे की स्मृती मंधाना लवकरच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इतिहासात आपले नाव आणखी वर नेऊ शकेल का.