३३ लिटर संशयित दूध जप्त;अन्न व औषध प्रशासनाची भेसळविरोधी मोहीम
आकोट :
Tukaram Mundhe महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार राज्यभर भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अकोला जिल्ह्यात कारवाई करण्यात आली आहे. सहायक आयुक्त (अन्न) दे. गो. वीर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा विभागाने चोहोट्टा बाजार येथील दूध डेअरीची तपासणी करून संशयित दुधाचा साठा जप्त केला.याशिवाय अकोला शहरात देखील तपासणीला वेग आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी र. व्दा. सोळंके यांनी १६ जून २०२६ रोजी मे. श्रीकृपा दुध डेअरी अँड स्वीट मार्ट, मेन रोड, चोहोट्टा बाजार, ता. अकोट, येथे तपासणी केली. तपासणीदरम्यान विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मिक्स मिल्क (लूज) या अन्नपदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला.तसेच भेसळीच्या संशयावरून संबंधित डेअरीतील उर्वरित ३३ लिटर दुधाचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या या साठ्याची किंमत २ हजार ३१० रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली. राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी घेतलेला नमुना पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे अधिनियमांतर्गत आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
अनेक भागातील हॉटेल बंद
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाच्या कारवाईचा धसका घेतल्याने सर्वाधिक वर्दळ असणारे देवरी व निंबा फाटा येथील हॉटेल सोमवार पासून बंद दिसून आले. याशिवाय दररोज पनीर विकणाऱ्यांकडे देखील मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.याशिवाय अकोला शहरात देखील विविध हॉटेलची तपासणी एफडीएकडून सुरू आहे.
कुल्फी, पेप्सीचा साठा रस्त्यावर फेकला
अकोला-अकोट मार्गावरील पळसोद फाट्याजवळ हजारो कुल्फी, पेप्सी रस्त्यालगत फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आल्या असून एफडीए च्या कारवाईच्या भीतीने अज्ञात दुकानदारांनी हा माल टाकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देखील कारवाईची गती व तपासणी याच्यात समन्वय ठेवून भेसळखोरांवरवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे.