दक्षिण कॅलिफोर्निया,
US B-52 bomber crash अमेरिकेच्या हवाई दलाला मोठा धक्का बसला असून त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या बॉम्बर विमानांपैकी एक असलेल्या बी-५२ स्ट्रॅटोफोर्ट्रेसचा भीषण अपघात झाला आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील मोजावे वाळवंट परिसरात नियमित चाचणी उड्डाणादरम्यान हे विमान कोसळल्याने त्यामधील आठही जणांचा मृत्यू झाला.हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, विमानाने एडवर्ड्स हवाई तळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच नियंत्रण गमावून दुर्घटनाग्रस्त झाले. अपघाताची माहिती मिळताच बचाव आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. मात्र, विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने कोणालाही वाचवणे शक्य झाले नाही.
घटनास्थळावरील दृश्ये अत्यंत भयावह होती. अपघातानंतर परिसरातील मोठा भाग आगीच्या विळख्यात सापडला होता आणि आकाशात काळ्या धुराचे लोट दिसत होते. सुरक्षेच्या दृष्टीने परिसर तात्काळ बंद करण्यात आला आणि तपास यंत्रणांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली.विमानात लष्करी अधिकारी तसेच संरक्षण क्षेत्राशी संबंधित काही तांत्रिक कर्मचारी प्रवास करत होते. हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करताना ही राष्ट्रीय स्तरावरील मोठी हानी असल्याचे म्हटले आहे. प्राथमिक तपासात अपघाताचे नेमके कारण समोर आलेले नसून तांत्रिक बिघाड, यांत्रिक समस्या किंवा इतर कारणांची चौकशी सुरू आहे. संपूर्ण तपास अहवाल तयार होण्यासाठी अनेक महिने लागू शकतात, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बी-५२ स्ट्रॅटोफोर्ट्रेस हे अमेरिकेच्या हवाई शक्तीचे प्रतीक मानले जाते. अनेक दशकांपासून सेवेत असलेले हे विमान लांब पल्ल्याच्या मोहिमा पार पाडण्यास सक्षम असून विविध लष्करी कारवायांमध्ये त्याचा वापर करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे अमेरिकेच्या हवाई दलासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले असून संपूर्ण संरक्षण यंत्रणेचे लक्ष आता तपासाच्या निष्कर्षांकडे लागले आहे.