ड्रोन कॅमेराव्दारे हत्तीवर वनविभागाची देखरेख
सावली,
Wild elephants in Savli Taluka वैनगंगा नदी काठातून गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सावली तालुक्यात रानटी हत्तींचा कळप दाखल झाला. करोली, सायखेडा, उसरपाक चक, उसरपाक तुकुम, मंगरमेंढा, पालेबारसा, जनकापूर, राजोली, गोलाभुज असा प्रवास करीत मूल तालुक्यातून परत एकदा सावली शहरातील मोठ्या तलावात या हत्तीच्या कळपाने मुक्काम ठोकला आहे.
सावली शहरात या रानटी हत्तीच्या कळपाला बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. वनविभाग व पोलिस विभागाच्या मदतीने नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवले गेले. यात हत्तींच्या कळपात एक टस्कर हत्तीसह 29 हत्तींचा समावेश आहे. सध्या हत्तींचा कळप व्याहाड खुर्द उपवनातील उपरी परीसरात दिसून आला. ड्रोन कॅमेराव्दारे वनविभागाने आपले लक्ष हत्तींच्या हालचालींवर ठेवले आहे. हत्तींचा फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी त्यांच्याजवळ जाऊ नये, सुरक्षित अंतर राखावे, त्यांना त्रास देऊ नये, रस्ता ओलांडताना थांबुन जावे, तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता वनविभागाच्या सुचनेनुसार वागावे व वनविभागास सहकार्य करावे, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.