सायबर गुन्हेगारांवर आता एआयचा वॉच!

पोलीस दलाला नवी ताकद

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
मुंबई,
AI now watches over cyber criminals महाराष्ट्र पोलीस दल अधिक सक्षम, आधुनिक आणि तंत्रज्ञानसज्ज करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र सरकारने राज्यातील पोलीस यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी ७३३.२८ कोटी रुपयांच्या विशेष योजनेला मंजुरी दिली असून यामुळे पोलीस दलाच्या विविध विभागांना मोठी बळकटी मिळणार आहे. या योजनेत केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे निधी उपलब्ध करून देणार आहेत. या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार व्यक्त केले. बदलत्या काळात गुन्हेगारीचे स्वरूप झपाट्याने बदलत असून पारंपरिक गुन्ह्यांसोबतच सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक आणि संघटित गुन्हेगारीची आव्हाने वाढत आहेत. अशा परिस्थितीत पोलीस दलाकडे अत्याधुनिक साधने आणि तांत्रिक क्षमता असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 

cyber criminals 
 
 
किनारपट्टीवरील सुरक्षा मजबूत होणार
मंजूर करण्यात आलेल्या निधीतून राज्यातील सायबर सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढवून ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच सायबर सेलची क्षमता वाढवण्यासाठी आधुनिक उपकरणे आणि तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.राज्याच्या विस्तीर्ण किनारपट्टीच्या सुरक्षेलाही या योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे. सागरी भागातील देखरेख अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक यंत्रणा, तांत्रिक साधने आणि आवश्यक संसाधनांची उभारणी केली जाणार आहे. यामुळे किनारपट्टीवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल.
 
 
याशिवाय पोलीस दलाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, जलद प्रतिसाद देणारी वाहने आणि विविध आधुनिक उपकरणांनी सज्ज करण्यात येणार आहे. महिला, बालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाधारित उपाययोजना राबवण्याचाही या योजनेत समावेश आहे. या निधीमुळे महाराष्ट्र पोलीस दलाची कार्यक्षमता वाढण्यासोबतच गुन्हेगारीविरोधातील लढाई अधिक प्रभावी होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सक्षम यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्र पोलीस दल देशातील अग्रगण्य आणि हायटेक दलांपैकी एक बनण्याच्या दिशेने वाटचाल करणार असल्याचे मानले जात आहे.