अमरावती महापालिका पशुवैद्यकीय अधिकार्‍याला कोठडी

-लाच मागितल्याचे प्रकरण -एसीबीने घेतले होते ताब्यात

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
अमरावती,
bribery-case : अमरावती महापालिका क्षेत्रातील मोकाट श्वानांचे निर्बीजिकरण व लसीकरण कंत्राटाची ४७ लाखांची देयके मंजूर करण्यासाठी २५ लाखांची लाच मागणी व पहिला हप्त्याची टोकन रक्कम एक लाख रुपये घेण्यास सहमती दर्शविणार्‍या महापालिकेच्या प्रभारी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे (वय ४७ वर्षे, रा. चिंचमलातपुरे, कलोती नगर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री १० वाजता घरून ताब्यात घेतले. बुधवारी त्यांची रवानगी न्यायालयाने पोलिस कोठडीत केली.
 
 

bribery-case 
 
 
 
अमरावती महापालिकेने शहरात श्वान उत्पत्ती नियंत्रण, निर्बीजिकरण व लसीकरणाचा कंत्राट स्थानिक एका संस्थेला दिला होता. संबंधित संस्थेने कामे पूर्ण केल्याचा दावा करीत विविध कामाची एकूण ४७ लाखाची देयके मंजुर करण्याकरीता महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागात सादर केली होती.
 
 
पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे यांनी संबंधित देयके मंजूर करण्यासाठी टप्प्याटप्प्याने २५ लाख लाचेची व त्याचा पहिला टप्पा म्हणून दोन लाख रुपये लाचेची मागणी केली, अशी तक्रार संबंधित संस्थेच्या व्यक्तीने ८ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीच्या अनुषंगाने अधिकार्‍यांनी १० जून रोजी पंचासमक्ष केलेल्या पडताळणीदरम्यान सचिन बोंद्रे यांनी पहिला टप्पा म्हणून तडजोडीअंती एक लाख लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
 
 
तक्रारदार व डॉ. बोंद्रे यांच्यात ११ जूनला रक्कम देण्याघेण्याचा व्यवहार पार पडणार होता. त्यासाठी बोंद्रे तक्रारदाराच्या दुचाकीवर बसून मनपा कार्यालयातून बाहेर पडले. पंचवटी चौकाकडे जाताना त्यांना तक्रारदारावर संशय आल्याने लाच न स्वीकारताच ते दुचाकीवरून खाली उतरले. शासकीय वाहन बोलावून त्यात बसून निघुन गेले होते. मंगळवारी दुसरा प्रयत्न करण्यात आला. बोंद्रे यांना पुन्हा तक्रारदारावर संशय आला. ते आता लाच रक्कम स्वीकारणार नसल्याची तक्रारदाराची खात्री झाल्याने तसे निवेदन तक्रारदाराने एसीबीला दिले.
 
 
बोंद्रे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले असल्याने त्यांना ताब्यात घेऊन शहर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक बापु बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिन्द्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपअधीक्षक सुनील किनगे, सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक निलीमा सातव, सापळा पथक पोलिस निरीक्षक रवींद्र सहारे, पोलिस अंमलदार उपेंद्र थोरात, वैभव जायले यांनी पार पाडली.