भोजाजी ते विठू माऊली वारकर्‍यांचा प्रवास!

शनिवारी आजनसराहून प्रस्थान

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
आजनसरा,
Ashadhi Wari आषाढी एकादशीच्या ओढीने विठुरायाच्या भेटीसाठी वारकर्‍यांचे पाय वेडावले आहेत. ज्ञानदेव-तुकारामांनी रुजवलेल्या भागवत धर्माचा ध्वज फडकवत, संत भोजाजी महाराज संस्थान आजनसरा येथून पालखी पदयात्रेचे शनिवार २० रोजी प्रस्थान होणार आहे. भोजाजी माऊली ते विठू माऊली असा वारकर्‍यांचा प्रवास होणार आहे.
 

Ashadhi Wari 2026, Pandharpur Wari pilgrimage 
शनिवारी ब्रह्ममुहूर्तावर काकड आरती, अभिषेक व महापूजेनंतर संत भोजाजी महाराजांच्या समाधी मंदिरातून ग्रामप्रदक्षिणा करून पालखी पंढरीनाथाच्या भेटीला प्रस्थान करणार आहे. भोजाजी महाराज की जयच्या गजरात श्रींच्या पादुकांसह निघणारी ही वारी एक महिना अखंड चालणार आहे. टाळ-मृदुंग-वीणेच्या निनादात, ज्ञानोबा माऊली तुकारामच्या अखंड गजरात शेकडो भाविक वारकरी या पायी वारीत सहभागी होणार आहेत. पहिला मुकाम सोकरामाता देवस्थान येथे होईल. त्यानंतर यवतमाळ, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव व सोलापूर या सहा जिल्ह्यांतून मार्गक्रमण करत ही दिंडी २० जुलै रोजी पंढरपुरात पोहोचेल. पायदळ पालखी मार्गात रात्री हरिकीर्तन, भारूड, प्रवचन व जागर होईल. गावोगावचे भजनी मंडळ दिंडीचे स्वागत करून रिंगण सोहळा सादर करणार आहेत. या दिंडीचे विणेकरी विठ्ठल धुर्वे महाराज यांच्या वाणीतून संतवाणीचा प्रसाद भाविकांना मिळणार आहे.
नोंदणी १६ ते १९ जून Ashadhi Wari  दरम्यान देवस्थान कार्यालयात करावी त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, २ पासपोर्ट फोटो, वैद्यकीय प्रमाणपत्र, टाळ नसल्यास भगवी पताका घेऊन दिंडीत चालण्यास अनुमती आहे. अधिक माहितीसाठी पालखी व्यवस्थापक बाळुमामा पाटील, मनोज महाराज क्षीरसागर, चोपदार पुसदेकर, पिंटू आष्टणकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे