कोलकाता,
shubhendu-adhikari : पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील फाल्टा पोलीस ठाण्यावर हल्ला करून तृणमूल काँग्रेसचे नेते जहांगीर खान यांची सुटका करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिला आहे.
जहांगीर खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने फाल्टा पोलीस ठाण्याकडे मोर्चा काढला. या जमावाचे नेतृत्व खान यांच्या पत्नीने केल्याचा आरोप असून, पोलीस ठाण्यात घुसून त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अनेक जणांना ताब्यात घेतले.
घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी कायदा हातात घेणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले जाईल, असे त्यांनी म्हटले. तसेच पोलीस ठाण्यावर हल्ला किंवा अटक केलेल्या व्यक्तीची बळजबरीने सुटका करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, खंडणीसह विविध गुन्ह्यांप्रकरणी जहांगीर खान यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर फाल्टा परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी सुरक्षा वाढविली आहे. या प्रकरणामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.