बी.एस्सी. भाग तीन निकालात एन्सिलेरी क्रेडिट घोळ

निकाल दुरुस्त करून घोषित करण्याची मागणी

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
अमरावती,
bsc-part-iii-results : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने नुकताच जाहीर केलेल्या बी. एस्सी. भाग -३, सेमेस्टर-६ च्या निकालामध्ये एन्सिलेरी क्रेडिट्सच्या गणनेबाबत निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नाकडे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. सोबतच शेकडो महाविद्यालयांनी प्रलंबित शुल्क न भरल्यामुळे रोखून ठेवण्यात आलेल्या निकालांच्या प्रश्नावरही महासंघाने तीव्र चिंता व्यक्त केली. या संदर्भात महासंघाच्या शिष्टमंडळाने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
 

bsc-part-iii-results 
 
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या विभागीय अध्यक्षा प्राचार्य डॉ. मीनल भोंडे यांच्या मार्गदर्शनात तसेच विभागीय महामंत्री प्रा. डॉ. मंगेश अडगोकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने सदर विषय मांडले. बी.एस्सी. सीबीसीएस अभ्यासक्रमातील अनेक विद्यार्थ्यांना एन्सिलेरी क्रेडिट्स अपूर्ण असल्याचे दर्शवून अनुत्तीर्ण घोषित करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाने विद्यापीठाद्वारे वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या बी.एस्सी. सीबीसीएस संबंधीच्या दिशानिर्देशांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षातील इंडक्शन प्रोग्राम, द्वितीय वर्षातील पर्यावरण अभ्यास, इंटर्नशिप, ओपन इलेक्ट्रिव्ह, एम.ओ.ओ.सी., कौशल्य अभ्यासक्रम तसेच विविध सहशैक्षणिक व अवांतर उपक्रमांमधून प्राप्त केलेले एन्सिलेरी क्रेडिट्स अंतिम गुणपत्रिकेत योग्य प्रकारे प्रतिबिंबित झाले आहेत किंवा नाहीत, याची सखोल पडताळणी करण्याची मागणी केली.
 
 
 
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून पात्र विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये तसेच क्रेडिट ट्रान्सफर अथवा क्रेडिट मॅपिंग प्रक्रियेमधील संभाव्य तांत्रिक त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंतीही शिष्टमंडळाने केली. याप्रसंगी विद्यापीठाचे उपकुलसचिव राहुल नरवाडे यांच्यासह प्रा. डॉ. दिनेश खेडकर, प्रा. डॉ. धनंजय बिजवे, प्रा. डॉ. उमेश कनेरकर व प्रा. डॉ. प्रवीण परिमल आदी उपस्थित होते.