तभा वृत्तसेवा
वणी,
bus-service : चंद्रपूर आगाराच्या वतीने पूर्वी सुरू असलेली चंद्रपूर-घुग्घुस-नकोडा-सावरा शिंदोला-मोहोेदा-मुकुटबन ही बससेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा नेते विजय पिदुरकर यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बससेवा चंद्रपूर आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांतील विद्यार्थी, महिला, शेतकरी, कामगार तसेच लहान व्यवसायींसाठी अत्यंत महत्त्वाची वाहतूक सुविधा होती. मात्र, मुकुटबन तालुक्यातील वर्धा नदीवरील नवीन पुलाच्या कामामुळे 2023 पासून ही बससेवा बंद करण्यात आली होती.
सध्या वर्धा नदीवरील नवीन रेल्वे व रस्ता पुलाचे काम पूर्णत्वास आले असून लवकरच सार्वजनिक वाहतुकीसाठी मार्ग खुला होणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे चंद्रपूर-घुग्घुस-नकोडा-सावरा शिंदोला-मोहोदा-मुकुटबन या मार्गावरील बससेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही बससेवा सुरू झाल्यास विद्यार्थी, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, लघु व्यावसायिक आणि कामगार यांना मोठा दिलासा मिळेल. तसेच घुग्घुस, मुकुटबन आणि चंद्रपूर या भागांदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित व किफायतशीर होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
या मागणीची दखल घेऊन चंद्रपूर आगारामार्फत संबंधित मार्गावरील बससेवा लवकरात लवकर पूर्ववत सुरू करावी, अशी विनंती विजय पिदुरकर यांनी केली आहे.