बांदीपोर,
Cloudburst wreaks havoc in Bandipora. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ परिसराला ढगफुटीचा जबरदस्त फटका बसला आहे. तुलेल खोऱ्यातील तरतेई किलो गावात अचानक झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.अचानक झालेल्या ढगफुटीनंतर मोठ्या प्रमाणावर चिखल, दगड आणि पाण्याचा लोंढा गावाकडे धावून आला. काही मिनिटांतच रस्ते आणि परिसर पाण्याखाली गेला. अनेक घरांचे नुकसान झाले असून गावातील दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेकडो एकर शेतीक्षेत्र पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनेनंतर नागरिकांनी तातडीने सुरक्षिततेचा मार्ग स्वीकारत आपली घरे रिकामी केली. लहान मुले, महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि जनावरे घेऊन ग्रामस्थांनी उंच ठिकाणी आश्रय घेतला. अनेक तास गावात भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण कायम होते. सुदैवाने या आपत्तीत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नुकसानाचा आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ढगफुटीमुळे प्रभावित झालेल्या भागात मदत आणि पुनर्वसनासाठी यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.