दत्तधामचा चौथा वर्धापन दिन सोहळा सोमवारी

दत्तयाग, सामूहिक पारायण, विविध कार्यक्रम

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
नागपूर,
dattadhams-fourth-anniversary : श्रीगुरुचरित्रातील १३ व्या आणि १४ व्या अध्यायाशी संबंधित पवित्र श्रीक्षेत्र बासर येथील स्वयंभू दत्त मंदिर अर्थात दत्तधामाचा चौथा वर्धापन दिन सोहळा ज्येष्ठ शुद्ध अष्टमी, सोमवार, २२ जूनला भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा होणार असून यानिमित्ताने दत्तयागासह विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन आहे.
 
 

ngp 
 
 
 
सद्‍गुरूदास स्वामी महाराज यांनी २०२२ मध्ये या दिव्य स्थळाचा शोध घेऊन जीर्णोद्धार केला. त्यानंतर येथे पारायण कक्षाची उभारणी करण्यात आली तसेच श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, सायंदेव महाराज आणि विष्णुदास स्वामी महाराज यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. धर्मभास्कर श्री सद्‍गुरूदास महाराज यांच्या आज्ञेनुसार त्यांच्या प्रेरणेने दत्तयाग, उपासना, सामूहिक पारायण, श्रीगुरुचरित्राच्या १४ व्या अध्यायाचे पठण, घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे सामूहिक आवर्तन तसेच भजन आदी कार्यक्रम होतील.
 
 
सुरुवात रविवारी २१ जूनला उपासकांच्या आगमनाने होईल. सायंकाळी उपासना, आध्यात्मिक कार्यक्रम व भजनाचा एक्का आयोजित करण्यात आला आहे. नाना महाराज तराणेकर यांचे नातू संजय महाराज तराणेकर यांच्या ‘गीत गुरुचरित्र’ गायनसेवेद्वारे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या गुरुचरित्राचे श्रवण स्वामींच्याच स्थळी होणार आहे. यावेळी पुढील कार्याबाबत सद्‍गुरूदास महाराजांचे पुत्र अजय देशमुख मार्गदर्शन करतील.
 
 
सोमवारी २२ जूनला सकाळी काकड आरती, चहा-नाश्ता व त्यानंतर सकाळी ८ ते ११ या वेळेत श्री दत्तयाग होईल. दत्तयागादरम्यान उपस्थित उपासकांकडून अखंड औदुंबर प्रदक्षिणा, श्रीगुरुचरित्राच्या १४ व्या अध्यायाचे तसेच घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे १०८ वेळा सामूहिक आवर्तन, सकाळी ११ वाजता पूर्णाहुती, आरती व समारोपीय मार्गदर्शन गुरुमंदिर परिवाराचे मार्गदर्शक अजेय देशमुख करतील. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
समर्थ विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्रातील उपासक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. या सोहळ्यास सर्व सद्‍गुरूभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री नरसिंह सरस्वती व सायंदेव सेवा समिती, बासर यांच्या वतीने करण्यात आले आहे.