देवळी,
rajesh-bakane : शहराच्या आर्थिक विकासाला चालना देतानाच नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने नप सभागृहामध्ये आ. राजेश बकाने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
बैठकीला नगराध्यक्ष किरण ठाकरे, उपाध्यक्ष राहुल चोपडा, पाणीपुरवठा सभापती प्रमोद ढोक, नगरपरिषद मुख्याधिकारी नेहा अकोडे, तहसीलदार समर्थ शिरसागर, भूमी अभिलेख अधिकारी प्रशांत देवघरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अश्विन मेश्राम व पवार, नगर रचना विभागाचे मिलिंद कवठेकर, एमआयडीसी उद्योजक असोसिएशनचे अनुप कुबडे उपस्थित होते.
देवळी एमआयडीसी ही नगरपरिषदेच्या हद्दीत येत असून, त्या क्षेत्रातील औद्योगिक आस्थापनांवर मालमत्ता कर आकारणी करण्याचा कायदेशीर अधिकार नगरपरिषदेला आहे. मात्र एमआयडीसीची स्थापना झाल्यापासून विविध प्रशासकीय आणि तांत्रिक कारणांमुळे नगरपरिषदेला या क्षेत्रातून मालमत्ता कराची वसुली करता आलेली नाही. नगराध्यक्ष किरण ठाकरे आणि उपाध्यक्ष राहुल चोपडा यांनी हा महत्त्वाचा विषय आ. राजेश बकाने यांनी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार बैठक घेण्यात आली.
यावेळी आ. राजेश बकाने यांनी देवळी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नपचे आर्थिक उत्पन्न वाढणे आवश्यक आहे. या विषयाचा सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय पैलूंनी अभ्यास करून नगरपरिषदेच्या हक्काचे उत्पन्न मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.
बैठकीदरम्यान मालमत्ता कर आकारणीसाठी आवश्यक असलेली जमीन व मालमत्तांची नोंद, अभिलेख, सीमांकन, कर निर्धारण प्रक्रिया तसेच संबंधित कायदेशीर बाबींचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांना आवश्यक माहिती व कागदपत्रांची पूर्तता करून हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सकारात्मक सहकार्य करण्याचे निर्देश दिले. देवळी शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार्या या विषयावर लवकरच पुढील कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार असून, नगरपरिषदेच्या हक्काचे उत्पन्न मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असा विश्वास आ. बकाने यांनी व्यत केला.