मुंबई
Dia Mirza Controversy अभिनेत्री दिया मिर्झा सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. हवामान बदल आणि जागतिक अशांततेसाठी पितृसत्ताक व्यवस्था जबाबदार असल्याचे विधान केल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर टीकेची झोड उठली. वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर दियाने आपली भूमिका स्पष्ट करत टीकाकारांना सविस्तर उत्तर दिले आहे.
अभिनेत्री असण्याबरोबरच संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी) ची सदिच्छा दूत असलेल्या दियाने अलीकडेच सोहा अली खान हिच्या पॉडकास्टमध्ये हवामान बदलाच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. या चर्चेदरम्यान तिने पितृसत्ताक व्यवस्थेवर टीका करत पर्यावरणीय संकटांच्या मुळाशी असमान सत्तासंरचना असल्याचा दावा केला.संवादादरम्यान दियाने म्हटले की, पितृसत्ता हे हवामान बदलाचे सर्वात मोठे कारण आहे. यावर सोहा अली खानने ‘पुरुषी अहंकारा’चा संदर्भ दिल्यानंतर दियाने पुढे सांगितले की, जगभरातील अनेक निर्णयप्रक्रिया आणि सत्ताकेंद्रे पुरुषप्रधान राहिल्याने पर्यावरणीय हानीला चालना मिळाली आहे. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी तिच्या मताला पाठिंबा दिला, तर अनेकांनी पुरुषांना हवामान बदलासाठी थेट जबाबदार धरण्यावर आक्षेप घेतला.
मत मांडले
वाद वाढल्यानंतर दियाने सोशल मीडियावर Dia Mirza Controversy सविस्तर भूमिका मांडली. तिने स्पष्ट केले की, तिचे विधान कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून विशिष्ट सामाजिक आणि राजकीय व्यवस्थांविरोधात आहे. हवामान बदल हा केवळ पर्यावरणीय प्रश्न नसून तो विषमता आणि न्यायाशी संबंधित मुद्दा असल्याचे तिने नमूद केले.दियाच्या मते, शतकानुशतके अस्तित्वात असलेल्या पितृसत्ताक व्यवस्थांनी निसर्गाच्या संवर्धनापेक्षा त्याच्या शोषणाला प्राधान्य दिले. नैसर्गिक संसाधने आणि असुरक्षित समुदायांकडे संरक्षणाऐवजी उपभोगाच्या दृष्टीने पाहिले गेले, असा तिचा दावा आहे. महिलांप्रमाणेच जंगले, नद्या, महासागर आणि परिसंस्था यांनाही केवळ संसाधन किंवा मालमत्ता म्हणून वागवण्यात आले असून त्याचे दुष्परिणाम आता स्पष्टपणे दिसत असल्याचे तिने म्हटले.पुढे बोलताना दियाने हवामान बदलाचा सर्वाधिक फटका महिला, मुली आणि दुर्बल समुदायांना बसत असल्याचे सांगितले. पाण्याची टंचाई, अन्नसुरक्षेचा अभाव, विस्थापन आणि उपजीविकेचे नुकसान यांसारख्या समस्यांना हे घटक सर्वप्रथम सामोरे जात असल्याचे तिने नमूद केले. त्यामुळे हवामान बदलावरील चर्चा ही केवळ कार्बन उत्सर्जनापुरती मर्यादित न राहता सामाजिक न्याय, समानता आणि मानवी हक्कांशीही जोडली गेली पाहिजे, असे तिचे मत आहे.
हवामान संकटाचा सामना करण्यासाठी शोषण आणि वर्चस्वावर आधारित व्यवस्थांपासून दूर जात समानता, सहकार्य, करुणा आणि निसर्गाबद्दल आदर या मूल्यांवर आधारित विकास मॉडेल स्वीकारण्याची गरज असल्याचे दियाने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.दरम्यान, तिच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मतमतांतरे निर्माण झाली असून, हवामान बदल आणि सामाजिक संरचना यांच्यातील संबंधांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. दियाच्या भूमिकेला काही पर्यावरण कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असताना, तिच्या विधानावरून वाद अद्याप कायम आहे.