अल-निनोचा प्रभाव पाणी जपून वापरा

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
वेध
गिरीश शेरेकर
Effect of El Niño गेल्या अनेक महिन्यांपासून विविध संस्था यंदा अल-निनोचा प्रभाव राहील, असे साांगत आहे. ‌‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम- रेंज वेदर फोरकास्ट्स‌’ने याच महिन्यात ‌‘सुपर अल - निनो‌’चा अंदाज वर्तविला आहे. हा सक्रिय झाल्यास भारतात अतिशय भीषण दुष्काळ, तीव्र उष्णता आणि परिणाम स्वरूप पिकांची हानी होईल, अशी भीती तज्ज्ञांना आहे. सुपर सक्रिय होणार की नाही, हे पुढे कळेलच! पण, तो होऊ नये यासाठी आपण सगळे प्रार्थना करू या! दर काही वर्षांनी येणाऱ्या अल-निनोचा प्रभाव मात्र मान्सून वाऱ्यांवर जाणवायला लागला आहे. जून महिन्याचे 17 दिवस होऊनही पावसाचा पत्ता नाही. सध्या काही भागात धावता वादळी पाऊस येतो आहे. त्या पावसाला मान्सून पूर्व म्हणता येईल. कोकण किनार पट्टीवर धडकताच मान्सूनचे वारे निष्क्रिय झाले. हे वारे तेथेच रेंगाळल्याने संपूर्ण राज्यालाच पावसाची प्रतीक्षा लागली आहे. समाधानकारक पावसावरच संपूर्ण वर्षभराचे जीवन चक्र अवलंबून असते. पाण्याची कमतरता या चक्राला बाधित करते. मग, त्याचे वेगवेगळे परिणाम पाहायला मिळते. निर्माण होत असलेल्या स्थितीला नियंत्रणात ठेवणे आपल्या हातात आहे. सध्या विविध प्रकल्पांमधले, विहिरीतले आणि कुपनलिकेच्या माध्यमातून मिळणारे पाणी काळजीपूर्वक वापरनेच सर्वांच्या हिताचे आहे. कारण, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्याची तीव्रता जास्त असल्याने पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. पाऊस लांबला तर ती धोक्याच्या पातळीपर्यंत येईल.
 
 
al nino
 
राज्यात मोठे, मध्यम, लघु असे तीन प्रकारचे पाणी प्रकल्प आहेत. त्याची एकूण संख्या 3028 आहे. त्यात मोठे 138, मध्यम 264, लघु 2626 आहे. या प्रल्पांमध्ये सरासरी 24.41 टक्के जलसाठा असून त्यातील उपयुक्त जलसाठा हा 9970.7 दलघमीच आहे. गेल्यावर्षी आजच्याच तारखेला हा जलसाठा 31.10 टक्के होता. म्हणजेच यंदा तो 6.69 टक्क्याने कमी आहे. विभाग निहाय स्थिती तपासली तर नागपूर विभागात या तिनही प्रकारातल्या एकूण प्रकल्पाची संख्या 387 आहे. येथे आज सरासरी 36.57 टक्के जलसाठा आहे. अमरावती विभागात 276 प्रकल्प असून 37.77 टक्के पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजी नगर विभागात 929 प्रकल्प आहेत, तेथील जलसाठा 26.72 टक्के आहे. नाशिक विभागात 539 प्रकल्प असून 25.07 टक्के पाणी आहे. पुणे विभागात 724 पाणी प्रकल्प आहेत. येथे फक्त 14.54 टक्के जलसाठा आहे. कोकण विभागात 173 पाणी प्रकल्प आहे. त्यात 29.77 टक्के पाणी आहे. आकडेवारीनुसार सर्वात कमी पाणीसाठा पुणे तर जास्त अमरावती विभागात आहे. एकंदरीतच दिवसागणीक पाणी पातळी कमी होत आहे. पाऊस लांबला तर ती आणखी कमी होणार आहे. अशावेळी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या योजनांवर प्रभाव जाणवेल.
 
 
अल - निनोच्या परिणामाची जाणीव राज्य सरकारला झाली आहे. शासनाने तातडीने आदेश काढून पाणी प्रकल्पांमधील जलसाठा अन्य कोणत्याही वापरासाठी बंदी टाकली आहे. जोपर्यंत समाधानकारक पाऊस होणार नाही, तोपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठीच हा साठा आता वापरण्यात येणार आहे. येत्या आठ ते दहा दिवसात पाऊस आला नाही तर विविध शहरातल्या पाणी पुरवठ्याची कपात करण्याचा निर्णय सुद्धा होऊ शकतो. सर्व सजीवांना पाण्याची गरज असते. कमी पाण्यात जर ती भागवायची असेल तर नियोजन आवश्यक आहे. शासन त्या कामी लागले असले तरी सर्व सामान्य नागरिकांचा त्या सहभाग अत्यंत आवश्यक आहे. शासनाने कितीही सांगितले आणि इकडे पाण्याचा बेसुमार वापर झाला तर तो अडचणीचा ठरू शकतो. माझी कुपनलिका, विहिर व नळ आहे मी, कसाही वापरील या मानसिकतेत असणाऱ्यांना जागे करावे लागेल आणि संभाव्य धोक्यांची कल्पना देऊन जागृत करावे लागेल. विविध शासकीय, निमशासकीय यंत्रणा, सर्व प्रकारच्या खाजगी संस्थेकडून जनजागृती सुरू केली पाहीजे. संभावित धोक्यांची तीव्रता कमी करण्यासाठी अशी जनजागृती उपयोगी ठरते. सर्व नागरिकांनी प्राधान्यक्रम ठरवून पाण्याचा वापर करावा. महाराष्ट्राने दुष्काळाच्या झळा यापूर्वी अनुभवल्या आहे. राज्य शासना प्रमाणेच ठिकठिकाणचे जिल्हा प्रशासन देखील कामाला लागले आहे. जिल्हधिकारी आढावा घेत आहेत. मान्सूनची विद्यमान स्थिती वाईट असल्याचे हवामान विभागाचे म्हणने आहे. अरबी समुद्रात अँटी सायक्लॉनी परिस्थिती निर्माण झाल्याने मान्सून वारे मागे ढकलले जात आहेत. त्यामुळे चालू कवा पुढच्या आठवड्यात मान्सून सक्रिय होईल की नाही, याची कोणतीच शाश्वती नाही. ठोस अंदाज घेऊनच सर्वांना वाटचाल करावी लागणार आहे.
 
9420721225