'नवराष्ट्रातील भटकंती' ई-बुकचे प्रकाशन उत्साहात

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
नागपूर,
navrashtratil bhatkanti e book सुप्रसिद्ध पर्यटन लेखक श्रीकांत पवनीकर यांच्या “नवराष्ट्रातील भटकंती – एका अनोळखी भारतात” या पहिल्या ई-बुकचे सामूहिक प्रकाशन हनुमान नगर येथील रामतारा सहनिवास परिसरात नुकतेच उत्साहात पार पडले. या छोटेखानी समारंभात विविध मान्यवर उपस्थित होते. नागपूरच्या नचिकेत प्रकाशन (श्रीनिकेत अनिल सांबरे) यांच्या माध्यमातून हे ई-बुक प्रकाशित करण्यात आले असून ते गुगल प्ले बुक आणि अमेझॉन किंडलवर अत्यल्प किमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पुस्तकात एकूण ५५ लेखांचा समावेश असून भारतातील अनेक अपरिचित व अनोळखी पर्यटन स्थळांची माहिती लेखकाने सविस्तरपणे मांडली आहे.
 
navrashtratil bhatkanti e book
 
या पुस्तकाचे मूळ स्वरूप ३०३ पानांचे असून ते अनाहत प्रकाशन (प्रसाद प्रकाशन, पुणे शाखा) यांनी प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला विदर्भ साहित्य संघ आणि साहित्य विहार या संस्थांकडून सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच लेखकाच्या “एक भारावलेली भ्रमंती” आणि “चौफेर नगरी” या दोन्ही पुस्तकांनाही प्रथम क्रमांकाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यावेळी नवसृष्टी संस्थेचे तसेच लॉयन्स क्लब स्मार्ट सिटीचे माजी अध्यक्ष समाजसेवक सतीश बैस यांनी ई-बुकच्या उपयोगितेबाबत मार्गदर्शन केले.
 
 
प्रवासात, कार्यालयात किंवा कुठेही मोबाईलवर सहज वाचन करता येणे ही ई-बुकची मोठी सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुस्तक खरेदीपूर्वी काही पाने मोफत वाचण्याची सुविधा असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात लेखक श्रीकांत पवनीकर यांनी आपले पर्यटन अनुभव कथन करत वाचकांशी संवाद साधला. उपस्थित मान्यवरांनी मोबाईलवर ई-बुक उघडून सामूहिक प्रकाशन करत लेखकाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता सहभोजनाने उत्साहपूर्ण वातावरणात झाली.
सौजन्य: श्रीकांत पवनीकर, संपर्क मित्र