अहेरी,
forest गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी वन परिक्षेत्रांतर्गत कक्ष क्रमांक 12 च्या राखीव वन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिक्रमणाविरुद्ध वन विभागाने मंगळवारी, 16 जून रोजी व्यापक आणि सुनियोजित कारवाई करत सुमारे 30 ते 35 हेक्टर वन जमीन अतिक्रमणमुक्त केली. वनसंपदेचे जतन आणि पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ताणबोडी गावाजवळ असलेल्या राखीव वन क्षेत्रात सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी वन विभागाच्या कर्मचार्यांना नवीन अतिक्रमण दिसून आले होते. त्यावेळी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कारवाईदरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे अतिक्रमण निष्कासनाची कारवाई पूर्ण होऊ शकली नव्हती. यावेळी वन विभागाने पूर्ण तयारीनिशी पोलिस आणि महसूल विभागाच्या सहकार्याने संयुक्त मोहीम राबवली. कारवाई दरम्यान चार जेसीबी मशीनच्या साहाय्याने अतिक्रमित क्षेत्राच्या सीमा निश्चित करून वन जमीन मुक्त करण्यात आली.
ही मोहीम मुख्य forest वनसंरक्षक (प्रादेशिक) गजेंद्र नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. तर, सहाय्यक वनसंरक्षक शिशुपाल पवार यांनी संपूर्ण कारवाईचे समन्वय केले.राखीव वनक्षेत्रांवर कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही आणि भविष्यातही अशा प्रकरणांमध्ये नियमानुसार कठोर कारवाई सुरूच राहील, असा ठोस इशारा वनविभागाने दिला आहे.याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण इंगळे यांनी नागरिकांना पर्यावरण संरक्षणात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत जंगल आणि वनसंपदेच्या रक्षणासाठी वनविवागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. वनसंपदेची सुरक्षा, पर्यावरणीय समतोल राखणे आणि भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्याच्या दिशेने अहेरी वन परिक्षेत्राची ही कारवाई एक अत्यंत महत्त्वाची आणि कौतुकास्पद मोहीम मानली जात आहे.
150 हून अधिक कर्मचार्यांचा सहभाग
या कारवाईत वन विभागाचे सुमारे 150 कर्मचारी सहभागी झाले होते. अहेरी, पेरमिली आणि आलापल्ली वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्यांनी संयुक्तपणे या मोहिमेत भाग घेतला. यावेळी अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण इंगळे, पेरमिलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी चौके आणि आलापल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर प्रामुख्याने उपस्थित होते.
पोलिस व महसूल विभागाचे सहकार्य
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागाच्या वतीने पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली चोख सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. तसेच, महसूल विभागाच्या वतीने नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी आवश्यक ते प्रशासकीय सहकार्य केले.