धारणी,
heavy-rainfall-in-dharni : धारणी शहरात बुधवारी सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि त्यानंतर मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास एक तास कोसळलेल्या पावसामुळे शहरासह परिसर अक्षरशः जलमय झाला.
गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते.
तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उकाड्याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. धारणी तालुक्यात पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक शेतकर्यांनी आधीच आपल्या शेतांची मशागत पूर्ण करून ठेवली होती. या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असला तरी पेरणीला सुरुवात करायची की नाही, या बाबत शेतकरी विचार करीत आहे. धारणी शहरासह आसपासच्या ग्रामीण भागातही पावसाची चांगली नोंद झाली. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. तरीही या पावसामुळे शेतकरी, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मान्सूनच्या आगमनाची चाहूल देणार्या या पावसामुळे मेळघाटातील शेतकर्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहे.