हिंगणघाट बाजार समितीकडून शेतकर्‍यांना पेरणी यंत्राचे वितरण : अ‍ॅड. कोठारी

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
हिंगणघाट,
APMC शेती व्यवसायात वाढती मजुरांची टंचाई, वाढलेले मजुरीचे दर व बदलत्या हवामानामुळे शेती व्यवसायावर परिणाम होतो. वेळेत पेरणी व मळणी न केल्यास त्याचा उत्पन्नावर होतो. त्यामुळे शेती व्यवसायात यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देणे ही गरज लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हिंगणघाट व समुद्रपूर तालुयातील शेतकर्‍यांना बियाणे व पेरणी यंत्राचे वितरण करण्यात येत आहे.
 

Hinganghat APMC Scheme, 
हिंगणघाट व समुद्रपूर तालुयातील शेतकर्‍यांना ५० टक्के अनुदानावर बियाणे टोकन, पेरणी यंत्राचा पुरवठा करण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यानुसार समितीमार्फत नामांकित बियाणे टोकन, पेरणी यंत्राचे उत्पादन, पुरवठा करणार्‍या फर्म कंपनीकडून दरपत्रक मागविण्यात आले आणि पडगीलवार कंपनीच्या रक्कम ५ हजार ५०० रुपये किंमतीच्या बियाणे टोकण यंत्राची निवड करण्यात आली. बाजार समितीकडून पुरवठा करण्यात येणारे बियाणे टोकन, पेरणी यंत्र मिळण्याकरिता शेतकर्‍यांनी सादर करावयाच्या मागणी अर्जाचे वितरण सुरू झाले असून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जाच्या क्रमांकानुसार समितीच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथून यंत्रांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. आजपर्यंत ११५० शेतकर्‍यांना टोकण यंत्राचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित पात्र प्रस्तावधारकांना सुद्धा त्यांच्या प्रस्तावाच्या क्रमांकानुसार यंत्र साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.
याशिवाय कै. वसंतराव APMC  नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अ‍ॅड. निलेश हेलोंडे पाटील यांच्या सूचनेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना १०० टक्के अनुदानावर बियाणे टोकण/पेरणी यंत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने हिगणघाट तालुयातील ५१ व समुद्रपूर तालुयातील १६ अशा एकूण ६७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची यादी समितीस प्राप्त झाली आहे. या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून आजपर्यंत ४२ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २६ पात्र आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोफत बियाणे टोकण/पेरणी यंत्रांचे वाटप बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांचे हस्ते करण्यात आले.
 
 
यावेळी बाजार समितीचे उपसभापती हरिष वडतकर, संचालक मंडळ मधुकर डंभारे, मधुसूदन हरणे, ओमप्रकाश डालिया, प्रफुल बाडे, डॉ. निर्मेश कोठारी, घनश्याम येरलेकर, पंकज कोचर, सचिव टी. सी. चांभारे व शेतकरी उपस्थित होते.