मुंबई,
First Electric Water Taxi संरक्षण क्षेत्रातील आघाडीची संस्था माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) यांनी देशातील पहिली १०० टक्के स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी विकसित केली आहे. भारतीय समुद्रातील आव्हानात्मक परिस्थिती लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या टॅक्सीच्या विविध चाचण्या सध्या सुरू असून आगामी पावसाळा तिच्यासाठी खरी कसोटी ठरणार आहे. या प्रकल्पाला यश मिळाल्यास देशात पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी एमडीएलने विकसित केलेल्या हायस्पीड इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीमध्ये सुमारे ६० टक्के परदेशी आणि ४० टक्के भारतीय उपकरणांचा वापर करण्यात आला होता. या बोटी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणासाठी विकसित करण्यात आल्या होत्या. मात्र भारतीय किनारपट्टीवरील समुद्री परिस्थिती, उंच लाटा, बदलते हवामान आणि चार्जिंग सुविधांच्या मर्यादा यांमुळे अपेक्षित कामगिरी साध्य करण्यात काही अडचणी आल्या. विशेषतः बॅटरी व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण संचालनाच्या बाबतीत आव्हाने निर्माण झाली होती.
या अनुभवातून धडा First Electric Water Taxi घेत एमडीएलने पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित नव्या पिढीची इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी विकसित करण्याचा निर्णय घेतला. नव्या मॉडेलमध्ये देशांतर्गत उत्पादित यंत्रसामग्री, नियंत्रण प्रणाली आणि इतर तांत्रिक घटकांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे परदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी होण्याबरोबरच देखभाल खर्चातही बचत होणार आहे. तसेच भविष्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे आणि देशभरात अशा सेवांचा विस्तार करणे अधिक सुलभ होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.एमडीएलच्या या उपक्रमामुळे जलवाहतुकीच्या क्षेत्रात नवे पर्व सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जलवाहतूक ही केवळ पर्यायी व्यवस्था न राहता दैनंदिन प्रवासासाठी प्रभावी आणि किफायतशीर साधन म्हणून विकसित व्हावी, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश असल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.सध्या या इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सींच्या विविध तांत्रिक चाचण्या सुरू आहेत. पावसाळ्यात उंच लाटा, जोरदार वारे आणि कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत त्यांच्या वेग, स्थिरता, बॅटरी क्षमता, ऊर्जा वापर आणि सुरक्षिततेची सखोल तपासणी केली जाणार आहे. या सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतरच व्यावसायिक वापरासाठी या टॅक्सींचा मार्ग मोकळा होणार आहे.प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात एमडीएलने विकसित केलेल्या दोन इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाला सुपूर्द करण्यात येणार आहेत. सुरुवातीला या बोटींचा वापर कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी केला जाणार असून त्यातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे देशातील इतर जलमार्गांवरही अशा सेवांचा विस्तार करण्याची योजना आखण्यात आली आहे. स्वदेशी तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक वाहतूक आणि कमी खर्च यांचा संगम साधणारा हा प्रकल्प देशाच्या जलवाहतूक क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.