इंडो-पॅसिफिक कमांडचा यूटर्न; जुनी ओळख पुनर्स्थापित!

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Indo-Pacific Command's U-turn अमेरिकेच्या लष्करी व्यवस्थेत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला असून इंडो-पॅसिफिक कमांड (USINDOPACOM) चे नाव बदलून पुन्हा ‘यूएस पॅसिफिक कमांड’ (USPACOM) करण्यात आले आहे. अमेरिकेच्या युद्ध विभागाने हा निर्णय जाहीर केला असून, या बदलामुळे कमांड तिच्या ऐतिहासिक नावावर परतली आहे. हा बदल 2018 मध्ये करण्यात आलेल्या नावबदलाला मागे घेत असल्याचे मानले जात आहे. त्या वेळी हिंद महासागर क्षेत्राचे वाढते सामरिक महत्त्व लक्षात घेऊन नावात ‘इंडो’ हा शब्द जोडण्यात आला होता. मात्र आता पुन्हा जुन्या नावाकडे परत जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
 
dt56
 
अमेरिकेच्या युद्ध विभागाने स्पष्ट केले आहे की, या नावबदलाचा लष्करी मोहिमा, कार्यक्षेत्र किंवा धोरणात्मक भूमिकेवर कोणताही परिणाम होणार नाही. कमांडचे कार्यक्षेत्र पूर्वीप्रमाणेच कायम राहणार असून ते अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून ते भारताच्या पश्चिम सीमेजवळील भागापर्यंत विस्तारलेले आहे.या कमांडच्या अधिकृत नकाशांमध्ये भारताचा उल्लेखही करण्यात आला असून, काही भागांमध्ये पाकिस्तान-व्याप्त काश्मीर (PoK) पाकिस्तानचा भाग म्हणून दाखवण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या नकाशांवर चर्चा सुरू झाली आहे.
 
 
अमेरिकेने या निर्णयामागे ऐतिहासिक ओळख आणि संस्थात्मक वारसा जपण्याचा उद्देश असल्याचे सांगितले आहे. पॅसिफिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लष्करी कर्मचाऱ्यांमध्ये एकता आणि अभिमान वाढवणे हा या बदलामागील हेतू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.यूएस पॅसिफिक कमांडची स्थापना 1947 मध्ये झाली असून ती अमेरिकेची सर्वात जुनी आणि मोठी एकीकृत लढाऊ कमांड मानली जाते. सुमारे 3.75 लाखांहून अधिक लष्करी आणि नागरी कर्मचारी या कमांडच्या अंतर्गत कार्यरत आहेत. या नावबदलानंतरही सामरिक धोरण, भागीदार देशांशी सहकार्य आणि क्षेत्रीय सुरक्षा यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.