मुंबई
Jamun Fruit राज्यात मान्सूनची प्रतीक्षा अद्याप कायम असताना काही भागांमध्ये जांभूळ झाडांवर मोठ्या प्रमाणावर फळधारणा दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर “जांभळांचा सडा पडणे म्हणजे आगामी दुष्काळाचा इशारा” असा दावा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यावरून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र पर्यावरण व हवामान तज्ज्ञांनी हा दावा पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे.
जैवविविधता आणि Jamun Fruit पर्यावरण अभ्यासक डॉ. अंकूर पटवर्धन यांच्या मते, झाडांवरील फळधारणा ही भविष्यातील हवामानाचा कोणताही विश्वासार्ह अंदाज देत नाही. झाडांची फुलोरा व फळधारणा प्रक्रिया ही पाण्याची उपलब्धता, स्थानिक हवामान, तापमान, मातीतील पोषक घटक आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांची उपस्थिती यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे केवळ जांभळांची भरघोस फळधारणा पाहून दुष्काळाचा निष्कर्ष काढणे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.एल निनोसारख्या जागतिक हवामान घटकांचा पर्जन्यमानावर परिणाम होऊ शकतो, हे मान्य असले तरी त्याचा आणि जांभळांच्या फळधारणेचा थेट संबंध असल्याचे कोणतेही शास्त्रीय पुरावे उपलब्ध नाहीत, असेही तज्ज्ञ स्पष्ट करतात. व्यापक हवामान आणि स्थानिक सूक्ष्म हवामान यामध्ये असलेला फरक समजून घेणे आवश्यक असल्याचे ते सांगतात. नदीकाठी किंवा पाण्याची उपलब्धता असलेल्या भागातील झाडांवर फळधारणा अधिक दिसून येऊ शकते, तर कोरड्या भागात ती तुलनेने कमी असू शकते.
जांभूळ हे परागीभवनासाठी Jamun Fruit प्रामुख्याने मधमाश्या आणि इतर कीटकांवर अवलंबून असलेले झाड आहे. फुलोऱ्याच्या काळात अवकाळी पाऊस, गारपीट किंवा जोरदार वारे नसल्यास फुलांचे नुकसान कमी होते आणि फळधारणा वाढते. तसेच मागील वर्षी अनुकूल पर्जन्यमान झाल्यास झाडांमध्ये पोषक घटकांचा साठा तयार होतो, ज्यामुळे पुढील हंगामात फळांचे उत्पादन अधिक दिसून येते, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.पारंपरिक निरीक्षणे आणि लोकज्ञान यांचा आदर ठेवणे महत्त्वाचे असले तरी हवामानाचा अंदाज केवळ अशा एकाच घटकावर आधारित ठेवणे वैज्ञानिक दृष्ट्या योग्य नसल्याचे अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरत असलेला “जांभळांचा सडा म्हणजे दुष्काळाचा इशारा” हा दावा दिशाभूल करणारा असून त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, असा निष्कर्ष तज्ज्ञांनी नोंदवला आहे.