उमरखेडमध्ये शिवसेना कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

तीन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
life-threatening-attack : शहरातील हनुमान वॉर्ड येथील रहिवासी तथा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे उपाध्यक्ष आणि शिवसेना कार्यकर्ते रमेश गुलाबसिंग चव्हाण (वय 60) यांच्यावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी चाकू व लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवार, 16 जून रोजी रात्री घडली. या प्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 

attack 
 
 
 
पोलिसांच्या माहितीनुसार, रमेश चव्हाण मंगळवारी रात्री आपल्या दुचाकीने घरी जात असताना काही अज्ञात युवक त्यांचा पाठलाग करत असल्याचा त्यांना संशय आला. नगर पालिका मुख्याधिकाèयांच्या शासकीय निवासस्थानाजवळ पोहोचताच तीन युवकांनी त्यांच्या दुचाकीसमोर वाहन आडवे लावून त्यांना अडविले.
 
 
यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत चव्हाण यांच्या गळ्यावर चाकू लावला. त्यांनी प्रतिकार केल्यानंतर आरोपींनी लोखंडी गजाने त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी ‘आज तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत त्यांचा पाठलाग करून मारहाण केली. मात्र चव्हाण यांनी आरडाओरडा केल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली असून त्यांच्यावर उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
 
या प्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 109 (1), 296, 126 (2) व 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकट गंगलवाड करीत आहेत.