गोंदिया,
Lokram Shende गोंदिया जिल्ह्याच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली असून जिल्ह्यातील प्रसिद्ध झाडीबोली कवी लोकराम शेंडे यांची ‘सरावन मईन्यात’ ही कविता राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या चौथीच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे झाडीबोली भाषेला आणि विदर्भाच्या लोकसंस्कृतीला शालेय स्तरावर विशेष स्थान मिळाले असून झाडीबोलीची कविता आता संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये गाजणार आहे.
‘सरावन मईन्यात’ या कवितेत श्रावण महिन्याचे निसर्गसौंदर्य, ग्रामीण जीवनातील आनंद, पावसाळ्यातील वातावरण आणि लोकजीवनाचे चित्रण झाडीबोलीच्या सहज, सोप्या आणि गोड भाषेत करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना स्थानिक बोलीभाषेची ओळख व्हावी तसेच ग्रामीण संस्कृतीचे जतन व्हावे, या दृष्टीने या कवितेचा अभ्यासक्रमात समावेश महत्त्वाचा मानला जात आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील म्हसवाणी या छोट्याशा गावचे सुपुत्र कवी, गझलकार, जेष्ठ साहित्यिक लोकराम शेंडे यांनी लिहिलेली ही कविता संपुर्ण महाराष्ट्रातील मराठी शाळांमध्ये शिकवली जाणार आहे. विशेष म्हणजे, म्हसवानी गावात अनेक कलावंताचा भरणा असून संगीत नाटक, दंडार, पारंपारिक बैठकी लावणी, खडी गंमत, गोंधळ, ड्रामा, तमाशा, झांजू, ददरीया नृत्य अशा अनेक लोककलांनी समृद्ध असे हे गाव आहे. लोकराम शेंडे यांनी बालपणी वयाच्या पाचव्या वर्षीच दंडार लोकनाट्यात पदार्पण केले. सातव्या वर्षी बाल स्त्री कलावंत म्हणून बालनाट्य रंगभूमीवर पदार्पण. त्यानंतर त्यांच्या नाटकांचा अखंड प्रवास सुरू राहीला. एकच प्याला, कट्यार काळजात Lokram Shende घुसली यासह अनेक सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक नाटकात नट म्हणून त्यांनी अभिनय केले आहे. लहानपणापासूनच दंडार व मराठी नाटकांमध्ये काम करत त्यांनी साहित्य लेखनाचे काम सुरू ठेवले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून झाडीबोली रत्न हा पुरस्कार देखील त्यांना देण्यात आलेला आहे.