सामाजिक समरसतेचे प्रतीक महाराणा प्रताप

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
स्वाभिमानपूर्वक संघर्षाचे प्रतीक असलेले वीर स्वाभिमानी महाराणा प्रताप यांची १७ जून रोजी ४८६ वी जयंती. त्यानिमित्ताने...
maharana pratap  महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे १५४० (विक्रम संवत १५९७ ज्येष्ठ शुक्ल तृतीया) रोजी राजस्थानातील कुंभलगड या दुर्गम किल्ल्यावर झाला. मेवाडच्या राजघराण्यातील महाराणा उदयसिंह व माता जयवंता बाई यांच्या उदरी जन्मलेल्या प्रतापांनी बालपणापासूनच शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचे संस्कार आत्मसात केले होते. पुढे ते मेवाडचे राज्यकर्ते झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्याच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याकामी दिल्लीच्या तख्तावरील सामर्थ्यशाली बादशाहशी आयुष्यभर संघर्ष केला होता. महाराणा प्रताप यांची राष्ट्रभक्ती ही केवळ राजकीय नव्हती, तर ती सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांशी जोडले गेलेली होती.
 

maharana pratap 
 
 
मेवाडच्या राजगादीवर आरूढ होताच राणा प्रतापना सातत्याने शत्रूशी लढावे लागले. त्यांनी आपल्या उत्तरार्धच्या कालखंडात चावंडच्या क्षेत्रात मेवाडची राजधानी स्थापित केल्यावर मोठ्या प्रमाणावर कृषी विकास घडवून आणला होता. याकामी राणा प्रतापांनी सुरुवातीला शेतकर्‍यांना शेतीसाठी शासनाकडून जमिनी उपलब्ध करून देण्यासोबतच काही शेतकर्‍यांना बैल, बियाणे व शेतीशी संबंधित अवजारासाठी आर्थिक सहाय्य दिले होते. ही बाब तत्कालीन त्यांच्या संदर्भातील कागदपत्रांमध्ये प्रखरपणे पाहावयास मिळते.
 इ. स. १५७६ च्या हल्दीघाटीच्या युद्धाने राणा प्रतापांच्या इतिहासाला व शौर्याला नवे आयाम प्रदान केले होते. या अनिर्णायक युद्धानंतरही राणा प्रताप जवळपास २० वर्षांपर्यंत मोगलांच्या साम्राज्यशाहीच्या झुंडीविरोधात सतत संघर्ष करीत राहिले. यासाठी त्यांना पराकोटीचा त्याग, ऐश्वर्य, निरंतर संघर्ष व रानावनातील वनवास पत्करावा लागला. मात्र ते अखेरच्या श्वासापर्यंत मोगलांना शरण गेले नाहीत, यातच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख समोर येते. राणा प्रतापांच्या या दीर्घकालीन संघर्षात त्यांच्यापुढे अनेक संकटे आलीत, परंतु त्यांनी कधीही पराभव स्वीकारला नाही. दुर्गम जंगल क्षेत्रात राहून, कष्ट सहन करून आणि मर्यादित साधन संपत्तीच्या बळावर त्यांनी मेवाडचा मोठा भूभाग पुन्हा आपल्या अधिपत्याखाली आणण्यात यश प्राप्त केले होते.
महाराणा प्रताप यांचे सामाजिक विचारही तितकेच प्रेरणादायी होते. त्यांच्या सैन्यात विविध जाती, धर्म आणि समाज घटकांतील लोकांना समान सन्मानाचे स्थान देण्यात आले होते. हकीम खान सूरसारख्या मुस्लिम सेनानीवर त्यांनी विश्वास दर्शवित त्यास हल्दीघाटीच्या युद्धात एका तुकडीचे नेतृत्व बहाल केले होते. यावरून त्यांच्या दृष्टीने राष्ट्रहित आणि कतृर्त्व हेच सवार्ेच्च मूल्य असल्याची जाणीव होते. हिंदुस्तान पादाक्रांत करण्याची इच्छा बाळगणार्‍या अकबर बादशहाला शेवटपर्यंत मेवाडची भूमी आपल्या अधिपत्याखाली आणता आली नव्हती. याच गोष्टीचे शल्य सातत्याने अकबराला मनात बोचत राहिले होते. बादशाह अकबर हा राणा प्रताप यांना अन्य राजपूत नरेशांप्रमाणे मोगल दरबारात त्यांच्या सेवकाच्या रूपात उपस्थित करू इच्छित होता. त्यामुळेच त्याने ‘काहीही करून राणा प्रतापांना शाही दरबारात आणा’ असे त्याने त्यांच्या प्रत्येक शांतिदूतास वेळोवेळी आदेश दिलेले होते. किंबहुना या कामी अकबराने कूटनीतीचाही वापर केलेला होता. मात्र महाराणा प्रतापांनी अकबराची ही नीती वेळीच ओळखत आपल्या स्वाभिमानी बाण्यानेच त्यास उत्तर दिले होते.maharana pratap वेळप्रसंगी राणा प्रताप यांनीही कूटनीतीचा अवलंब करीत बराच काळ मोगल सत्तेसोबत संघर्ष टाळून त्यांच्या भविष्यातील आक्रमणाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक ती तजवीज करण्यावर भर दिला होता. राणा प्रतापांनी मेवाडच्या सार्वभौमत्वासाठी कूटनीतीचा अवलंब केला होता. अकबराच्या शिष्टमंडळास वेळोवेळी टोलवून लावले होते. मात्र, १८ जून १५७६ च्या हल्दीघाटीच्या युद्धानंतर केवळ चार महिन्यातच अकबर बादशाह राणा प्रतापांना कैद करण्यासाठी स्वतः मेवाडवर चालून आला होता. त्यानंतर इ.स. १५७७ ते १५७९ पर्यंत त्याने तीन वेळा त्यांचा प्रमुख सेनापती शहाबाजखानला शाही सेनेसह मेवाडवर पाठविले असले, तरी त्यास यश मिळू शकले नव्हते. ही बाब अकबराच्या दृष्टीने मोठी नाचक्की ठरली होती.
 
तत्कालीन काळात मेवाडमध्ये केसरिया बाणा या पद्धतीचे मोठ्या प्रमाणावर प्रचलन होते. यात जेव्हा किल्ल्याच्या आतून लढाई करणे शक्य नाही, ही बाब लक्षात येताच राजपूत सेनानी किल्ल्याचे दरवाजे सताड उघडे करून शत्रूवर तुटून पडत व शत्रूला यमसदनी पाठवीत स्वतःलाही त्या यज्ञकुंडात संपवून घेत. मात्र राणा प्रतापांनी ही परंपरा विचारपूर्वक दूर सारली होती. राणा प्रतापांनी ‘मारू वा मरू’ या कृतीवर भर देण्याऐवजी स्वतःला वाचविता वाचविता मेवाडलाही वाचवले. राणा प्रतापांनी हल्दीघाटीच्या रणसंग्रामातून बाहेर पडण्याचा जर निर्णय घेतला नसता, तर आज राणा प्रताप हे स्वातंत्र्यवीर लोकांसाठी जेवढे वंदनीय प्रेरणादायक आहेत, तेवढे ते कदापि बनले नसते.
 
राणा प्रतापांनी संपूर्ण मेवाडवर अधिपत्य मिळविले असले, तरी त्यांना मेवाडचा मानबिंदू चित्तोडगढ प्राप्त करता न आल्याचे शल्य त्यांना सातत्याने बोचत होते. हेच शल्य उरात घेऊन १९ जानेवारी १५९७ रोजी वयाच्या ५७ नव्या वर्षी राणा प्रतापांचे चावंडच्या महालात अकाली देहावसान झाले. महाराणा प्रतापांच्या मृत्यूची बातमी अकबर बादशहाच्या लाहोर येथील दरबारात पोहोचली. तेव्हा अकबर स्तब्ध झाला. राणा प्रताप यांच्या निधनाची वार्ता ऐकून त्यास आनंद होण्याऐवजी दुःख झाल्याचे पाहून दरबारी लोकांना आश्चर्य वाटले. त्या दरबारात उपस्थित असलेला चारण दूरसा आढा याने बादशहाची मनस्थिती लक्षात घेऊन मारवाडी भाषेत षष्टक (छप्पय) सादर केले. त्याचा अर्थ असा- ज्याने आपल्या घोड्यांना डाग लागू दिले नाहीत, ज्याने स्वतःची पगडी कोणापुढे झुकविली नाही, आज तो गात गात निघून गेला, जो हिंदुस्थानच्या ओझ्याची गाडी डाव्या बाजूने ओढत होता, जो कधीही नौरोजच्या जलाशयात गेला नाही, जो कधी शाही डेर्‍यात गेला नाही, ज्याच्या झरोक्याचा धाक सर्व जगाला आहे, अशा झरोक्याच्या खाली तो कधी उभा राहिला नाही, असा राणा प्रताप विजयी होऊन निघून गेला. त्याच्या जाण्याने बादशहाने आपले तोंड घट्ट मिटले व ते स्तब्ध झाले. एक उसासा सोडून त्यांचे डोळे पाण्याने भरले. हे प्रताप तुझ्या मरणाने असे झाले. यावरून राणा प्रतापांच्या जाण्यामुळे मेवाडच्या जनतेला जेवढे दुःख झाले होते, तेवढेच दुःख बादशहा अकबराला झाल्याचे यातून स्पष्ट होते. किंबहुना आपल्या शत्रूला सुद्धा आपल्या जाण्याची हुरहुर लागावी, अशा प्रकारचे राणा प्रतापांचे व्यक्तिमत्त्व असल्याचे यातून सिद्ध होते.
 
राणा प्रतापांचे जीवन आपल्याला स्वाभिमानाचे महत्त्व शिकवते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तत्त्वांशी तडजोड करू नये, हा संदेश त्यांनी आपल्या आचरणातून दिला. आज भारताला शौर्याबरोबरच चारित्र्य, राष्ट्रनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यपरायणतेची गरज आहे. महाराणा प्रताप यांचे जीवन या सर्व मूल्यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. युवकांनी त्यांच्या संघर्षातून जिद्द, त्यांच्या राष्ट्रभक्तीतून देशप्रेम आणि त्यांच्या सामाजिक दृष्टिकोनातून समरसतेचे धडे घेण्याची आवश्यकता आहे. महाराणा प्रताप हे केवळ राजस्थानचे किंवा राजपूत समाजाचेच नरेश नव्हते , तर ते संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे जीवन आपल्याला स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देत राहील. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याचा, सामाजिक एकात्मता जपण्याचा आणि आपल्या कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करण्याचा संकल्प करूया. स्वाभिमानासाठी जगणे आणि राष्ट्रासाठी संघर्ष करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
 
प्रा. डॉ. सुधाकर इंगळे
नागपूर