जी-७ मध्ये मोदी-मेलोनी भेट सोशल मीडियावर ट्रेन्ड video

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
पॅरिस,
Modi-Meloni meeting at G7 फ्रान्समध्ये पार पडलेल्या जी-७ शिखर परिषदेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली. जागतिक घडामोडींवरील महत्त्वाच्या चर्चांबरोबरच दोन्ही नेत्यांमधील हलक्याफुलक्या संवादाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.परिषदेतील सामूहिक छायाचित्रासाठी सर्व नेते एकत्र आले असताना मोदी आणि मेलोनी यांनी एकमेकांचे हसतमुखाने स्वागत केले. यावेळी झालेल्या थोडक्याच संभाषणात दोघांनीही सोशल मीडियावरील त्यांच्या लोकप्रियतेचा उल्लेख केला. भेटीच्या आनंदाची भावना व्यक्त करताना मेलोनी यांनी विनोदी अंदाजात, “आम्ही इंस्टाग्रामवरील सर्वात प्रसिद्ध जोडी आहोत,” अशी टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.
 
 

Modi-Meloni  
 
मोदी आणि मेलोनी यांच्या भेटींशी संबंधित ‘मेलडी’ हा हॅशटॅग गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाला आहे. दोन्ही नेत्यांच्या नावांमधून तयार झालेला हा शब्द अनेकदा चर्चेत राहिला आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय परिषदांदरम्यान त्यांचे एकत्रित फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात.या लोकप्रियतेची सुरुवात २०२३ मधील दुबई येथे झालेल्या हवामान परिषदेदरम्यान झाली होती. त्यावेळी मेलोनी यांनी मोदींसोबतचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या पोस्टनंतर ‘मेलडी’ हा हॅशटॅग जगभरात ट्रेंड झाला आणि इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला.
 
 
 
 
यानंतर विविध आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्येही दोन्ही नेत्यांच्या भेटी चर्चेचा विषय ठरत राहिल्या. काही महिन्यांपूर्वी रोम भेटीदरम्यान मोदी यांनी मेलोनी यांना ‘मेलडी’ नावाच्या टॉफीचे पॅकेट भेट दिल्याची घटनाही सोशल मीडियावर चांगलीच गाजली होती. त्या प्रसंगाचा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला होता. आता जी-७ परिषदेत झालेल्या या नव्या संवादामुळे ‘मेलडी’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राजनैतिक बैठकींच्या गंभीर वातावरणात झालेला हा हलकाफुलका संवाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून नेटकऱ्यांकडून त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.