मुंबई
Mumbai Water Crisis ‘अल निनो’च्या परिणामामुळे यंदा मान्सूनने ओढ दिल्याने जून महिना अत्यंत कोरडा ठरला असून, याचा थेट परिणाम मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील साठ्यावर झाला आहे. पावसाच्या लांबलेल्या प्रतिक्षेमुळे जलसाठ्यात मोठी घट झाल्याने मुंबई महानगरपालिकेने पाणीटंचाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर आणि व्यापक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १५ मे २०२६ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा वापर मर्यादित ठेवण्यासाठी पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी होणाऱ्या पाणीवापरावरही बुधवार, १७ जून २०२६ पासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. उपलब्ध पाणीसाठा अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सद्यस्थितीत मुंबई शहर आणि उपनगरांसाठी दररोज सुमारे ४,६६४ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असताना प्रत्यक्षात सुमारे ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. धरणांतील एकूण पाणीसाठा घटून १६ जून २०२६ रोजी तो केवळ १०.३५ टक्क्यांवर आल्याचेही महापालिकेने नमूद केले आहे. पावसाळा लांबल्याने निर्माण झालेल्या या परिस्थितीत पुढील काही आठवडे अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर पाण्याच्या वापरावर कठोर नियंत्रण आणण्यात आले असून बांधकामांसाठी देण्यात आलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन बांधकामांना जलजोडणी देणे पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. तसेच सर्व जलतरण तलावांच्या जलजोडण्याही तात्पुरत्या बंद करण्यात येणार आहेत.
औद्योगिक, व्यापारी तसेच स्पोर्ट्स Mumbai Water Crisis ‘ क्लबना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात लागू करण्यात आली आहे. पाणीवापराचा गैरवापर टाळण्यासाठी काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून नियमभंग झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महापालिकेने दिला आहे.याशिवाय सार्वजनिक स्वच्छतागृहे, वाहन धुणे, उद्याने आणि रस्ते स्वच्छतेसाठी शक्य तिथे बोअरवेल, विहिरी आणि टँकर पाण्याचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच विविध शासकीय आणि औद्योगिक आस्थापनांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांतील शुद्ध केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.मुंबईच्या पाणीपुरवठ्याची सध्याची स्थिती पाहता पुढील काही दिवसांत पावसाचे आगमन न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात आले आहे.