देहरादून,
NEET student commits suicide देहरादूनमधील चंद्रबनी परिसरात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या २४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभ्यासाच्या ताणातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी म्हणजेच नीटसाठी तयारी करत होती आणि तिने नुकतीच परीक्षा दिली होती. मंगळवारी सकाळी ती खोलीतून बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तरुणीचा मृतदेह आढळून आला.घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली असून त्यात तिने “मी तुमच्यावर ओझे आहे, कृपया मला माफ करा” असा मजकूर लिहिल्याचे समोर आले आहे. या संदेशामुळे कुटुंबीय आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. विद्यार्थिनीच्या अभ्यासाचा ताण, मानसिक स्थिती तसेच इतर वैयक्तिक कारणांचा तपास केला जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की सर्व बाजूंनी चौकशी करूनच अंतिम निष्कर्ष काढला जाईल.