नवी दिल्ली,
New Zealand squad announced न्यूझीलंड क्रिकेटने २०२६-२७ हंगामासाठी केंद्रीय करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली असून त्यात काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले आहेत. अनुभवी फलंदाज डेव्हन कॉनवे आणि वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनर यांचे केंद्रीय करारात पुनरागमन हे या घोषणेचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. गेल्या काही काळापासून विशेष स्वरूपाच्या करारावर असलेल्या डेव्हन कॉनवेला पुन्हा पूर्ण केंद्रीय करार देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या कॉनवेने सर्वच प्रकारांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आगामी काळात न्यूझीलंडसमोर महत्त्वाच्या कसोटी मालिकांचे आव्हान असल्याने त्याचा अनुभव संघासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे.

दुसरीकडे, वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनरने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रभावी कामगिरीच्या जोरावर पुन्हा निवडकर्त्यांचा विश्वास संपादन केला आहे. अलीकडच्या सामन्यांमध्ये सातत्याने विकेट्स घेणाऱ्या टिकनरने आपल्या गोलंदाजीने विशेष छाप पाडली आहे.या दोघांच्या पुनरागमनामुळे काही खेळाडूंना मात्र केंद्रीय करारातून बाहेर पडावे लागले आहे. युवा खेळाडू आदित्य अशोक आणि मोहम्मद अब्बास यांना यावेळी करार यादीत स्थान मिळालेले नाही. तर जॅक फॉल्क्स आणि मिच हे या युवा खेळाडूंनी आपले स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. गेल्या वर्षी प्रथमच करार मिळालेल्या या दोघांनी गेल्या हंगामात प्रभावी कामगिरी करून निवडकर्त्यांचा विश्वास टिकवला.
न्यूझीलंड क्रिकेटमध्ये नव्या पिढीला संधी देतानाच अनुभवी खेळाडूंवरही भर दिला जात असल्याचे या यादीतून स्पष्ट झाले आहे. आगामी आंतरराष्ट्रीय हंगाम लक्षात घेऊन संतुलित संघबांधणी करण्याचा प्रयत्न निवड समितीने केल्याचे दिसून येते. दरम्यान, अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या केन विल्यमसनचे नाव केंद्रीय करार यादीत नसल्याने एका युगाचा अधिकृतपणे अंत झाल्याची भावना क्रिकेटप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे. आता न्यूझीलंडचा संघ नव्या हंगामात कोणती कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.