मुंबई
Sharad Pawar राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ला आता वेग आल्याचे संकेत मिळत आहेत. आतापर्यंत या कथित राजकीय घडामोडींबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असली, तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल की नाही याबाबत अनिश्चितता होती. केंद्रात भारतीय जनता पक्षाकडे स्वतःच्या बळावर स्पष्ट बहुमत नसले, तरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत असल्याने मोदी सरकारच्या स्थैर्यावर कोणताही धोका नसल्याचे मानले जात होते. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’बाबत साशंकता कायम होती. मात्र, दिल्ली आणि महाराष्ट्रातील अलीकडील राजकीय हालचालींमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच हे खासदार केंद्रातील मोदी सरकारलाही समर्थन देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भेटीगाठी
या संभाव्य घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्ष नेतृत्वाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत खासदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. पुढील एक-दोन दिवसांत पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली जाण्याची शक्यता असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षांतराच्या शक्यता नाकारता येत नसल्याने नेतृत्वाने सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीत Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने उल्लेखनीय कामगिरी करत आठ जागांवर विजय मिळवला होता. दुसरीकडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ रायगड मतदारसंघातील एकच जागा मिळाली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत चित्र पूर्णपणे बदलले. शरद पवार गटाला केवळ दहा जागांवर समाधान मानावे लागले, तर अजित पवार गटाने तब्बल ४२ जागा जिंकत आपली ताकद सिद्ध केली.दरम्यान, ठाकरे गटातील काही खासदारांमध्ये पक्ष नेतृत्वाबाबत नाराजी असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सहज भेट मिळत नसल्याची आणि आपल्या प्रश्नांवर अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची भावना काही खासदारांनी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपल्या पक्षात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी तातडीने पावले उचलल्याचे मानले जात आहे.पक्षाच्या आगामी बैठकीत खासदारांच्या तक्रारी, अपेक्षा आणि संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा होणार असून, पक्षातील एकजूट कायम ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत घडणाऱ्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.