बीड,
Amol Pawar बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील शेतकरी अमोल पवार यांनी कमी खर्चात सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग करून शेती क्षेत्रात एक सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्वामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असताना, पवार यांनी अत्यंत स्वस्त दरात घरगुती पद्धतीने तयार होणारे ‘गोकृपा अमृत’ वापरून उत्पादन खर्चात लक्षणीय बचत साध्य केली आहे.
अमोल पवार यांनी दिलेल्या Amol Pawar माहितीनुसार, अवघ्या शंभर रुपयांच्या खर्चात तीन एकर क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणारे हे सेंद्रिय द्रावण तयार करता येते. यासाठी दोन किलो गूळ, दोन लिटर ताक आणि एक लिटर गोकृपा अमृत यांचे मिश्रण 200 लिटर पाण्यात मिसळून तीन दिवस झाकून ठेवले जाते. त्यानंतर तयार होणारे हे मिश्रण पिकांच्या वाढीसाठी आणि जमिनीच्या सुपीकतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते, असा त्यांचा दावा आहे.हे द्रावण महिन्यातून दोन वेळा ड्रेचिंग पद्धतीने पिकांना दिले जाते. यामुळे पिकांची वाढ सुधारते, मुळांची ताकद वाढते तसेच जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाण टिकून राहण्यास मदत होते. परिणामी रासायनिक खतांचा वापर कमी करूनही समाधानकारक उत्पादन मिळत असल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला आहे.
जमिनीची सुपीकता टिकणार
या प्रयोगामुळे शेतीतील Amol Pawar खर्च कमी होण्याबरोबरच जमिनीची सुपीकता टिकवण्यास मदत होत असल्याचेही समोर आले आहे. वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर अशा पर्यायी सेंद्रिय पद्धती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे चित्र आहे. परिसरातील अनेक शेतकरी अमोल पवार यांच्या शेताला भेट देऊन या पद्धतीची माहिती घेत आहेत.शाश्वत शेतीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय ठरत असून कमी खर्चात दर्जेदार उत्पादन मिळविण्याच्या या प्रयोगामुळे सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.