नागपूर,
pravin bagde अखिल भारतीय सर्वधर्म समाज पार्टीच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम रविवारी बजरंग नगर येथील गृहनिर्माण सोसायटीत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अब्दुल वहीद पटेल होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून डॉ. अब्दुल बारी आणि कवी तन्हा नागपुरी उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून प्रशासकीय अधिकारी व सामाजिक विचारवंत प्रवीण बागडे, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर सोमकुवर तसेच आयु. अशोककुमार डोहारे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रवीण बागडे यांनी सांगितले की, “गुण हे यशाचे एक मापदंड असले तरी व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक बांधिलकी आणि सातत्यपूर्ण ज्ञानार्जन हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे.” विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी जिद्द, परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. अब्दुल बारी यांनी सर्वधर्म समभाव, सामाजिक सलोखा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालक व शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या यशोगाथा सादर केल्या. पालकांनी अशा प्रेरणादायी उपक्रमांचे स्वागत करत विद्यार्थ्यांसाठी असे मार्गदर्शनपर कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या वेळी महिपाल मेश्राम, किरण गायकवाड, बबला पाटील, भरत पानतावणे, विनील चौरासिया व चंद्रभान चकोले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आयोजकांनी केले. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि मान्यवरांचे मार्गदर्शन यामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
सौजन्य: प्रवीण बागडे, संपर्क मित्र