पॅरिस,
donald-trump : फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जी-७ परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. सुमारे १६ महिन्यांनंतर दोन्ही नेत्यांची प्रत्यक्ष भेट झाली. या भेटीत ट्रम्प यांनी मोदींच्या शांत आणि संयमी स्वभावाचे कौतुक करत, “मी मोदींसारखा कूल आणि शांत नाही,” असे वक्तव्य केले. तसेच त्यांनी मोदींना “शांत, कूल आणि प्रभावी नेता” असे संबोधले.
जी-७ परिषदेत दोन्ही नेत्यांमध्ये उबदार संवाद झाल्याचे पाहायला मिळाले. परिषदेदरम्यान हस्तांदोलन करताना ट्रम्प यांनी मोदींशी काही काळ चर्चा केली. या भेटीमुळे भारत-अमेरिका संबंधांतील सकारात्मक वातावरण पुन्हा अधोरेखित झाले.
दरम्यान, जी-७ परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी जागतिक स्तरावर विश्वास, सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर यांचे महत्त्व अधोरेखित केले. जगासमोर संसाधनांची नव्हे, तर विश्वासाची कमतरता हे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले.
या भेटीत व्यापार, ऊर्जा, संरक्षण सहकार्य आणि विविध जागतिक घडामोडींवरही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.