अमरावती,
amravati-legislative-council-voting : विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. सुरूवातीला तिरंगी वाटणारी ही लढत काँग्रेस उमेदवाराने अचानक माघार घेतल्या एकतर्फी झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार मात्र रिंगणात कामय आहे.
सदर निवडणुकीसाठी दोन मतदारांचे निधन झाल्याने आता एकूण ४५१ मतदार जिल्ह्यातल्या ७ मतदान केंद्रांवर मतदान करणार आहे. धारणी तहसील कार्यालय, एसडीओ कार्यालय अचलपूर, मोर्शी तहसील कार्यालय, तिवसा-भातकुली एसडीओ कार्यालय कॅम्प अमरावती, नवीन तहसील कार्यालय अमरावती, तहसील कार्यालय चांदूर रेल्वे या मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. धारणीत ४३, अचलपुरात ६९, मोर्शीत ८१, दर्यापुरात ६१, तिवस्यात ३८, अमरावतीत ९५, चांदूर रेल्वेत ६६ मतदार मतदान करतील. एकूण मतदारांपैकी २२७ महिला मतदार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सात अधिकारी नेमण्यात आले आहे. २२ जून रोजी या निवडणुकीची मतमोजणी नियोजन भवनात होणार आहे.
निवडणुकीच्या रिंगणात भाजपाचे प्रवीण पोटे, काँग्रेसचे हर्षजित देशमुख व वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा आहे. पण, काँग्रेस उमेदवाराने प्रकृतीच्या कारणावरून एकप्रकारे माघार घेतल्याने काँग्रेसचे मतदान संभ्रमात आहे. सलग दोन दिवस भूमिका घेऊन काँग्रेसने या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याची माहिती आहे. आता या भूमिकेचे पालन काँग्रेसचे मतदार करतात की गेल्या निवडणुकीसारखी त्यांची मते फुटतात का, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
दुसरीकडे भाजपासाठी ही निवडणूक एकतर्फी असली तरी त्यांचे नियोजन सुरूच आहे. बुधवारी पालकमंत्री बावनकुळे यांनी अमरावतीत येऊन पुन्हा बैठकी घेतली. आवश्यक त्या सूचना देऊन विक्रमी विजयाचा निर्धार केला. प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान पथक केंदांवर पोलिस बंदोबस्तात रवाना झाले. गुरूवारी जिल्ह्यात दुपारी ४ वाजेपर्यंत ड्राय डे राहणार आहे.