प्रिन्स यादव मृत्यू प्रकरण खान सरांना भोवणार!

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Prince Yadav death case फैसल खान ज्यांना खान सर म्हणून ओळखले जाते, आणि रोशन आनंद सर यांच्यातील वाद आता आणखी गंभीर वळणावर पोहोचल्याचे दिसत आहे. या प्रकरणात रोशन आनंद सर यांचे वकील निरंजन कुमार सिंह यांनी खान सर यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती दिली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हा वाद रोशन आनंद सर यांचे धाकटे भाऊ प्रिन्स यादव यांच्या मृत्यूशी संबंधित आहे. नेपाळमधील एका तुरुंगात असताना प्रिन्स यादव यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. या घटनेनंतर रोशन आनंद यांनी यापूर्वीच खान सर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता त्यांच्या वकिलांकडून हे आरोप अधिक तीव्र करण्यात आले आहेत.
 
 
Prince Yadav death case
 
माध्यमांशी बोलताना निरंजन कुमार सिंह यांनी दावा केला की, रोशन आनंद यांना चुकीच्या पद्धतीने एका प्रकरणात आरोपी बनवण्यात आले होते आणि कायदेशीर तरतुदींचा गैरवापर करून प्रकरण गंभीर करण्यात आले. त्यांच्या म्हणण्यानुसार, वास्तविक परिस्थिती वेगळी असूनही चुकीच्या दिशेने तपास वळवण्यात आला आहे.या प्रकरणात प्रिन्स यादव यांच्या मृत्यूचा तपास नेपाळ पोलिसांकडून सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच अधिकृत निष्कर्ष काढला जाईल, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत थांबलेल्या काही भारतीय नागरिकांची चौकशीही करण्यात आली असून एका नेपाळी नागरिकाला सशर्त सोडण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाच्या सर्व पैलूंचा सखोल तपास सुरू केला असून विविध देशांतील पोलिस यंत्रणांशी समन्वय साधला जात आहे. सध्या तपास सुरू असल्याने कोणताही निष्कर्ष काढणे टाळण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे वाद अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.