पोलिसांचा 'दावा फोल' कारवाईवर कोर्टाचा बडगा

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
पुणे
Pune Court  येथे महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा आणि पानमसाला मोठ्या प्रमाणात जप्त केल्याच्या प्रकरणात राजगड पोलिसांना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. सुमारे ८० लाख ३२ हजार ८०० रुपयांचा पानमसाला आणि तंबाखूचा साठा जप्त केल्यानंतरही तो मुद्देमाल तात्पुरता मूळ मालकाच्या ताब्यात देण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तपासातील त्रुटींवर न्यायालयाने स्पष्टपणे ताशेरे ओढले आहेत.
 

Pune Court   
राजगड पोलिसांनी २८ एप्रिल रोजी एका ट्रकला अडवून ११५ गोण्या पानमसाला आणि २५ गोण्या तंबाखूचा साठा जप्त केला होता. या कारवाईनंतर संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांचा दावा होता की हा प्रतिबंधित माल महाराष्ट्रात आणून विक्रीसाठी आणला जात होता.
 
 
मात्र न्यायालयीन सुनावणीदरम्यान व्यापाऱ्याच्या वतीने बाजू मांडताना वकिलांनी पोलिसांच्या संपूर्ण कारवाईवरच गंभीर प्रश्न उपस्थित केले. संबंधित माल राजस्थानमधील जोधपूर येथील व्यापाऱ्यासाठी असून तो कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांमध्ये नेण्यात येत होता, जिथे अशा प्रकारच्या मालावर बंदी नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. ट्रक महाराष्ट्राच्या हद्दीत जाणूनबुजून आणून कारवाई करण्यात आल्याचा आरोपही बचाव पक्षाने केला.
 
 
हे प्रकरण प्रथमवर्गPune Court  न्यायदंडाधिकारी डॉ. जी. आर. डोरनलपल्ले यांच्या न्यायालयात सुनावणीस आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलिसांच्या तपासातील त्रुटींवर बोट ठेवले. जप्त केलेला माल हा नाशवंत स्वरूपाचा असल्याने तो पोलीस ठाण्यात दीर्घकाळ ठेवणे योग्य नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे हा मुद्देमाल तात्पुरता मूळ मालकाच्या ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आले.तथापि, न्यायालयाने व्यापाऱ्याला एक महत्त्वाची अट घातली आहे. जप्त केलेला पानमसाला आणि तंबाखूचा साठा कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राच्या हद्दीत उतरवला जाणार नाही, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या निर्णयामुळे पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून राज्यात गुटखा तस्करीविरोधातील कारवाईच्या पद्धतीवरही नव्याने चर्चा सुरू झाली आहे.