वाडीतील लॉजिस्टिक कंपनीवर छापा; १८ बालकामगारांची सुटका

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
raid-on-logistics-company : बालकामगार प्रथेच्या विरोधात प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत वाडी परिसरातील नीता लॉजिस्टिक कंपनीवर संयुक्त कारवाई करत १८ बालकामगारांची सुटका करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार महिला व बालविकास, कामगार, शिक्षण आणि पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली.
 
 
 
k
 
 
 
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संबंधित आस्थापनावर छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान अल्पवयीन मुलांकडून काम करून घेत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर सर्व १८ बालकामगारांची तातडीने सुटका करून त्यांच्या संरक्षण आणि पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना तात्पुरत्या स्वरूपात बालगृहात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांचे समुपदेशन, शैक्षणिक पुनर्वसन आणि कुटुंबीयांशी संपर्क साधण्याची कार्यवाही संबंधित विभागांकडून सुरू आहे. प्राथमिक चौकशीत ही मुले विविध ठिकाणांहून आणण्यात आल्याचे समोर आले असून त्यांच्याकडून ट्रकवर माल चढविणे आणि उतरविण्याचे काम करून घेतले जात होते.
 
 
या प्रकरणी संबंधित आस्थापनाविरुद्ध बालकामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ तसेच सुधारित अधिनियम, २०१६ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. बालकामगारमुक्त आणि बालस्नेही समाज घडविण्यासाठी नागरिकांनी बालकामगार आढळल्यास त्वरित प्रशासन किंवा चाईल्ड हेल्पलाइनला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे आणि सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, शिक्षण विभागाचे प्रसेनजीत गायकवाड, कामगार विभागाच्या गायत्री दुबे व अविनाश डोके, पोलीस उपनिरीक्षक उत्तम जायभाये, हवालदार कमलेश ठाकरे, पोलीस अंमलदार मारुती मेश्राम, चाईल्ड हेल्पलाइनचे प्रतिनिधी तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.